नक्कीच काहीतरी दिसतंय, काहीतरी मुरतंय, – शरद पवार
घटनापीठाचा निकाल पाच वर्षे येणार नाही. तोपर्यंत आम्ही पुन्हा सत्तेवर येऊ, असा दावा करणारे बंडखोर शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांचा आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खरपूस समाचार घेतला.
‘त्यांचा’ सुसंवाद ज्युडिशिअलशी फारच चांगला दिसतो. इतकी जवळीक मी न्याय संस्थेच्या संबंधी कधीच ऐकली नव्हती. याचा अर्थ नक्कीच काहीतरी दिसतंय, काहीतरी मुरतंय, असा खोचक टोला पवार यांनी शिंदे गटाला लगावला. केंद्रातील भाजप सरकार ईडी, सीबीआय व इन्कम टॅक्सचा वापर करीत संसदीय लोकशाहीवरच हल्ला करत असून देशाला समर्थ पर्याय देण्याची तयारी आम्ही सुरू केली आहे, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
भाजप सरकारच्या विरोधात शरद पवार यांनी आजपासून राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. त्याची सुरुवात त्यांनी ठाण्यातून केली आहे. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीआधी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना शिंदे गटाने घटनापीठाबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता ते म्हणाले, राज्यातील सत्तासंघर्ष सध्या कोर्टात असून न्यायसंस्थेबद्दल काही जण संशय निर्माण करीत आहेत. याबाबतचा निर्णय फार लांबेल असे काही वाटत नाही. कारण प्रत्यक्ष सुनावणी सुरू होईल तेव्हा दोन, तीन तारखेमध्येच हा प्रश्न निकाली निघेल असे वाटते. इतकी पाच वर्षे थांबण्याची गरज नाही.