एक क्लिक आणि बँक खातं होईल रिकामं, ‘तो’ मेसेज तुम्हालाही आलाय का? आधी पाहा
फ्री फ्री फ्री (Free Free Free) , विशेष सूट ( Special discount ) , एकावर एक फ्री, खास फेस्टिव्ह ऑफर (festive offers) … तुम्हालाही असे मेसेजेस आले असतील तर सावधान. कारण असेच मेसेज तुमचा खिसा रिकामा करू शकतात.
सणावारांचे दिवस आहेत, त्यामुळे तुम्हालाही असे मसेजेस आले असतील किंवा येत्या काळात येऊ शकतात. मात्र अशा मेसेजेसपासून जरा सावध राहा. कारण असेच मेसेजेस पाठवून तुमचं बँक खातं रिकामं केलं जाऊ शकतं. स्वतः मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने याबाबत माहिती दिली आहे.
लोकांना गंडा घालण्यासाठी सायबर चोरटे कोणता पर्याय वापरतील काही सांगता येत नाही. सध्या इंटरनेटच्या माध्यमातून घडवून आणले जाणारे विविध प्रकारचे स्कॅम्स आपल्या समोर आहेत. अशात तुम्हाला डिस्काउंट ऑफर्सच्या बहाण्याने SMS पाठवले जातात. ज्यावर क्लिक करताच तुमचं बँकेचं खातं थेट रिकामं होऊ शकतं. सायबर अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार अशा लिंक्स आणि सोबतच बोगस वेबसाईट्सची संख्याही वाढलेली पाहायला मिळते. एखादी गोष्ट विकत घेण्यासाठी गुगलवर सर्च करताना तुम्ही सायबर चोरट्यांनी विणलेल्या याच जाळ्यात अडकतात आणि तुम्हाला लुटलं जातं.
आधी तुमच्यावर मानसिक हल्ला
अशाप्रकारे लूट करण्यासाठी सायबर चोरटे आधी तुमच्या मेंदूवर मानसिक हल्ला करतात. तुम्हाला पाठवलेल्या लिंकमध्ये हेच सायबर चोरटे अशा शब्दांचा वापर करतात ज्याची तुम्हला भुरळ पडू शकेल. बोगस ऑफर्सच्या लिंकमध्ये वापरलेले शब्द वाचून तुम्ही तात्काळ आनंदित होता, तुम्ही पटकन एक्ससाईट होतात, यालाच तुमच्या इमोशनल इंटेलिजन्सवर प्रभाव टाकणं बोललं जातं. याचाच फायदा सायबर चोरांना होतो.
बोगस लिंकने केला घात…
मुंबईतील ओम यांच्यासोबतही असंच काहीसं झालं. काही दिवसांपूर्वी ओम यांना स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सुरु असलेलता सेलचा मेसेज आला. ज्यामध्ये त्यांना खरेदीवरील मिळणाऱ्या डिस्काउंटबाबत माहिती दिलेली. त्यांनी याच लिंकवर क्लिक केलं, खरेदी केलेल्या गोष्टींचे पैसे भरले. मात्र त्यांनी विकत घेतलेल्या वस्तूंच्या किमतीपेक्षा अधिकचे पैसे कापले गेले.
या वर्षाच्या सुरुवातीपासून सायबर चोरीच्या तब्ब्ल 150 पेक्षा अधिक घटना समोर आल्या आहेत. यांमध्ये नागरिकांचं तब्बल 10 लाखांपेक्षा अधिकच्या रकमेचं नुकसान झालंय.