भाजप-शिंदेसेनेला धक्का! राज -उद्धव ठाकरेंची अखेर युती, वाचा काय म्हणाले दोघे बंधू…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन बंधू वीस वर्षांनी अखेर एकत्र आले आहेत. मनसे व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांची युती घोषीत झाली आहे.
संयुक्त महाराष्ट्राचा मंगलकलष आजच्याच दिवशी महाराष्ट्रात आणला गेला, मंगलकलश दिनाच्या मुहुर्तावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी युतीची आज घोषणा अधिकृतरित्या पत्रकार परिषदेत केली आहे.
राज ठाकरेंनी केली ऐतिहासिक घोषणा
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी (BMC आणि इतर २९ मनपा) शिवसेना (UBT) आणि मनसे यांच्या युतीवर शिक्कामोर्तब केले आहे. राज ठाकरेंनी यासंदर्भात घोषणा केली आहे. पत्रकार परिषदेपूर्वी दोन्ही नेत्यांनी शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतले. यावेळी दोन्ही नेत्यांच्या कुटुंबातील सदस्यही उपस्थित होते.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
उद्धव ठाकरे म्हणाले, “आमच्यात काही मतभेद नक्कीच होते, पण महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आणि मराठी माणसाच्या हितासाठी आम्ही हे सर्व बाजूला ठेवून एकत्र आलो आहोत. मुंबईवर चालून येणाऱ्या शक्तींना रोखण्यासाठी ही युती काळाची गरज आहे. ठाकरे घराण्याने संयुक्त महाराष्ट्रासाठी योगदान दिले असून आता मराठी माणसांच्या उरावर उपरे नाचत आहेत. न्याय हक्कांसाठी शिवसेना प्रमुखांनी शिवसेना स्थापन केली. इतकी वर्ष व्यवस्थित गेली पण आज परत पाहत आहोत की, मुंबईचे लचके तोडण्याचा प्रयत्न केले जात आहे, दिल्लीत बसलेलल्यांचेे मुंबईचे लचके तोडण्याचे मनसुबे आहेत.”
उद्धव ठाकरे म्हणाले, “आज आम्ही कर्तव्य म्हणून एकत्र आलो एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी यापुढे मुंबई आणि महाराष्ट्रावर वाकडी नजर ठेवणारे व मुंबई मराठी माणसांपासून महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न केल्यास राजकारणात खात्मा केल्याशिवाय राहणार नाही ही शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलो” असा राजकीय इशारा उद्धव ठाकरेंनी यावेळी दिला.
“आता तुटु नका, फुटू नका आणि मराठीचा वसा टाकू नका, मला खात्री आहे की मराठी माणूस सहजा कुणाच्या वाटेला जात नाही कुणी त्याच्या वाटेला आलाच तर परत सोडत नाही,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले. मुंबई आणि नाशिक मनपासाठी युती झाली असून बाकी ठिकाणी युतीचे शिक्कामोर्तब होईल हेही त्यांनी सांगितले.
काय म्हणाले राज ठाकरे?
राज ठाकरे म्हणाले, “माझी एक मुलाखत झाली होती, व त्या मुलाखतीत मी म्हटलं की, कुठ्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. या वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली. कोण किती जागा लढवणार आकडा काय हे मी नाही सांगणार.”
महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याच्या टोळ्या फिरत आहेत त्यात दोन टोळ्या आणखी आहेत जे राजकीय पक्षातील मुलं पळवत आहेत. जे निवडणुका लढवणार आहे त्या सर्व उमेदवारांना दोन्ही पक्षांकडून उमेदवारी दिली जाईल, फाॅर्म कधी भरायचे ते कळवूच असेही राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे म्हणाले, “ज्या दिवसाची प्रतिक्षा महाराष्ट्र करत होता ती गोष्ट मी सांगतो की, शिवसेना आणि मनसेची युती झाली हे मी जाहीर करतो. आहे मी नेहमीच म्हणायचो की वेळ आल्यावर योग्य निर्णय घेईन. आज ती वेळ आली आहे. ही युती केवळ निवडणुकीपुरती नसून, महाराष्ट्राच्या अस्मितेचा लढा पुन्हा एकदा घराघरात पोहोचवण्यासाठी आहे.”
विरोधकांवर निशाणा
दोन्ही नेत्यांनी सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. “ही ‘दगाबाज’ सरकारला धडा शिकवण्याची सुरुवात आहे,” असे त्यांनी नमूद केले. उद्धव ठाकरेंची ही शेवटची निवडणूक आहे अशा प्रश्नावर राज ठाकरेंनी धडाकेबाज उत्तर दिले की, उत्तर देवाला द्यायला हवे, दानवांना नाही. मुंबईचा महापौर मराठी होईल आणि शिवसेना आणि मनसेचा होईल.











