जनरल नॉलेज

जगन्नाथ मंदिराचे चारही दरवाजे उघडले, मंदिरातील 22 पायऱ्यांचं रहस्य माहिती आहे का?


 

ओडिशामधील भाजपा सरकारनं पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीत जगन्नाथ पूरी येथील श्री जगन्नाथ मंदिराचे चारही दरवाजे उघडण्यास परवानगी दिली होती. राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर हे दरवाजे गुरुवारी उघडण्यात आले.

भाजपानं निवडणुकीच्या प्रचारात याचं आश्वासन दिलं होतं. कोरोना व्हायरसच्या काळानंतर फक्त एकाच दरवाज्यातून प्रवेश मिळत होता. त्यामुळे भक्तांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. आता चारही दरवाजे उघडण्यात आल्यानं मंदिरातील गर्दीपासून भक्तांची सुटका होणार आहे. या निमित्तानं जगन्नाथ मंदिरांचे चार दरवाजे कोणते? त्याचं महत्त्व काय? त्याचबरोबर या मंदिरातील अन्य महत्त्वाबाबत जाणून घेऊया

दरवाज्यांची नावं काय ?

जगन्नाथ मंदिराच्या बाहेरच्या भिंतीला पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण दिशांना चार दरवाजे आहेत. पहिल्या दरवाजाचे नाव सिंहद्वार (सिंहाचा दरवाजा), दुसऱ्या दरवाजाचे नाव व्याघ्रद्वार (वाघाचा दरवाजा), तिसऱ्या दरवाजाचे नाव हस्तीद्वार (हत्तीचा दरवाजा) आणि चौथ्या दरवाजाचे नाव अश्वद्वार (घोड्याचा दरवाजा) आहे. हे सर्व दरवाजे धर्म, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानले जातात.

 

 

प्रत्येक दरवाजाचं महत्त्व

पूर्वेकडील सिंहद्वार : हे जगन्नाथ मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे. या दारावार दोन सिंहाच्या प्रतिमा आहेत. या दरवाज्यातून मंदिरात प्रवेश केला तर मोक्ष प्राप्ती होते, अशी श्रद्धा आहे.

पश्चिमेकडील व्याघ्रद्वार : जगन्नाथ मंदिराच्या या प्रवेशद्वारावर वाघाची प्रतिमा आहे. नेहमी धर्माचं पालन करावं ही शिकवणं हे दार देतं. वाघ हे इच्छेचंही प्रतीक मानलं जातं. विशेष भक्त आणि संत या दरवाज्यातून मंदिरात प्रवेश करतात.

उत्तरेकडील हस्तीद्वार : या दरवाजाच्या दोन्ही बाजूला हत्तीच्या प्रतिमा आहेत. हत्ती हे लक्ष्मी मातेचं वाहन मानलं जातं. मुघलांनी या मंदिरावर आक्रमण केलं त्यावेळी हत्तीच्या या मूर्तींची तोडफोड केली असं सांगितलं जातं. त्यानंतर या मूर्तींची दुरुस्ती केली गेली. हा दरवाजा ऋषींच्या प्रवेशासाठी आहे, असं सांगितलं जातं.

दक्षिणेकडील अश्वद्वार : या दरवाजांच्या दोन्ही बाजूला घोड्यांच्या मूर्ती आहेत. विशेष म्हणजे या घोड्यांच्या पाठीवर भगवान जगन्नाथ आणि बालभद्र यांच्या युद्ध मोहिमेसाठी सज्ज आहेत. हा दरवाजा विजयाचं प्रतीक मानला जातो.

जगन्नाथ मंदिरातील 22 पायऱ्यांचं रहस्य

पुरीच्या जगन्नाथ धाम मंदिरात 22 पायऱ्या आहेत. या सर्व पायऱ्या मानवी आयुष्यातील उणीवांचं प्रतीक आहेत. धार्मिक मान्यतेनुसार या पायऱ्या अत्यंत गूढ आहेत. या पायऱ्यांवर जाणाऱ्या भक्तांना तिसऱ्या पायरीचा विशेष खबरदारी घ्यावी लागते. पौराणिक कथेनुसार या तिसऱ्या पायरीवर पाव ठेवू नये. ही पायरी यम शिला समजली जाते. यावर पाय ठेवले तर मनुष्याचे सर्व पुण्य धुतले जातात आणि त्याला वैकूंठात नाही तर यमलोकात जावं लागतं, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे भगवान जगन्नाथच्या दर्शनाला जाताना तिसऱ्या पायरीवर पाय न ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

मंदिरात 22 पैकी सध्या 18 पायऱ्याच दिसतात. दोन पायऱ्या अनादा बाजाराकडं तर दोन पायऱ्या मंदिराच्या स्वयंपाकघराच्या दिशेनं आहेत. या सर्व पायऱ्यांची उंची आणि रुंदी 6 फूट तर लांबी 70 फूट आहे. काही पायऱ्यांची रुंदी 15 फूट असून काहींची रुंदी 6 फुटांपेक्षा कमी आहे. भगवान जगन्नाथचं दर्शन करण्यासाठी या सर्व पायऱ्या पार कराव्या लागतात.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button