धार्मिक

कुऱ्हाड उचलली आणि कापलं आपल्या आईचं मुंडकं, परशुरामाने असं का केलं?


अक्षय्य तृतीयेचा सण यंदा 10 मे रोजी आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भगवान परशुराम यांची जयंतीही साजरी केली जाते. परशुराम हे भगवान विष्णूच्या दशावतारांपैकी सहावे अवतार मानले जातात.

हिंदू धर्मात जे सात चिरंजीव मानले जातात त्यांमध्ये भगवान परशुरामांचाही समावेश होतो. अक्षय्य तृतीया अर्थात वैशाख शुक्ल तृतीया या दिवशी परशुराम जयंती साजरी केली जाते. भविष्यपुराणातल्या माहितीनुसार, सत्ययुग आणि त्रेतायुगाचा प्रारंभ या तिथीला झाला होता. या दिवशी परशुरामांची पूजा करून त्यांना अर्घ्य देण्याचं महात्म्य मोठं आहे.

 

भगवान विष्णूचा सहावा अवतार असलेल्या परशुरामांनी आपल्याच आईचे प्राण घेतले होते. तसंच, परशुरामांनी आपल्या चार सख्ख्या भावांचीही हत्या केली होती.धार्मिक पुराणातल्या कथेनुसार, महर्षी जमदग्नी आणि माता रेणुका यांच्या पोटी परशुरामांचा जन्म झाला. जमदग्नी ऋषींना पाच पुत्र होते. रुमणवान, सुषेण, वसू, विश्वावसू आणि परशुराम अशी त्यांची नावं होती. परशुराम सर्वांत धाकटे होते. त्यांचं नाव राम असंच होतं; मात्र भगवान शिवशंकरांनी त्यांना परशू नावाचं अस्त्र दिलं, तेव्हापासून त्यांना परशुराम या नावाने ओळखलं जाऊ लागलं.

चिरंजीव परशुराम यांना अस्त्र-शस्त्रांचं संपूर्ण ज्ञान आहे. त्यांनी भीष्म पितामह, द्रोणाचार्य आणि कर्ण हे वीर त्यांचे शिष्य होते. श्रीमद्भागवतमधल्या एका दृष्टांतात सांगितल्यानुसार, परशुरामांनी आपल्याच आईचा शिरच्छेद केला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे परशुराम आई-वडिलांचे परमभक्त होते.

श्रीमद्भागवतमधल्या कथेत असं लिहिलं आहे, की जमदग्नी ऋषी करत असलेल्या हवनासाठी त्यांची पत्नी आणि परशुरामांची आई रेणुका दर दिवशी नदीवर पाणी आणायला जायची. एके दिवशी तिला नदीजवळ गंधर्वराज चित्ररथ काही अप्सरांसह विहार करताना दिसले. ते पाहून ती आसक्त झाली आणि तिथेच थांबून ते पाहू लागली. त्यामुळे तिला पाणी घेऊन जायला उशीर झाला आणि हवनकाल संपला. त्यामुळे महर्षी जमदग्नी क्रोधित झाले. त्यांनी रेणुका हिला उशीर झाल्याचं कारण विचारलं, तेव्हा तिने खरं सांगितलं नाही; मात्र जमदग्नी ऋषींकडे दिव्य दृष्टी होती. त्यामुळे त्यांना तिथे काय घडलं हे माहिती होतं.

पत्नी रेणुका हिने खोटं सांगितल्यामुळे जमदग्नी ऋषी क्रोधित झाले. त्यांनी तिला सांगितलं, की ‘परपुरुषाचा विहार पाहून तू पतिव्रता स्त्रीच्या मर्यादेचं उल्लंघन केलं आहेस. या अपराधासाठी तुला मृत्युदंड देत आहे.’ क्रोधित झालेल्या महर्षी जमदग्नींनी रुमणवान या आपल्या मोठ्या मुलाला बोलावलं आणि अपराधाची शिक्षा म्हणून आईचा वध करण्यास सांगितलं. ते ऐकूनच तो थरथर कापू लागला. ज्या आईने जन्म दिला, तिची हत्या कशी करू, असा प्रश्न त्याला पडला. त्याने नकार दिल्यावर सर्व मुलांना महर्षींनी बोलावलं आणि हेच करायला सांगितलं. सर्वांनी नकारच दिला; मात्र परशुरामाने वडिलांच्या आज्ञेचं पालन केलं आणि आपली आई, तसंच चारही भावांचा वध केला.

परशुरामाची आपल्याप्रति असलेली भक्ती आणि त्याने केलेलं आपल्या आज्ञेचं पालन पाहून महर्षी जमदग्नी खूश झाले. त्यांनी परशुरामाला वरदान मागण्यास सांगितलं. त्यावर परशुरामांनी सांगितलं, की ‘माझी आई आणि चारही भावांना जिवंत करा आणि या वधाशी संबंधित असलेल्या त्यांच्या साऱ्या आठवणी पुसून टाकण्याचं वरदान मी मागतो आहे.’

हे ऐकताच महर्षी जमदग्नी प्रसन्न झाले. त्यांनी आपली पत्नी आणि चारही मुलांना जिवंत केलं. या प्रकारे परशुरामांनी आपल्या वडिलांच्या आज्ञेचं पालनही केलं आणि आपली आई आणि भावांना जीवनदानही दिलं.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button