1200 एकर जमीन, 200 फ्लॅट्सचा मालक आणि कोट्यवधींच्या घोटाळ्यातील आरोपी पोलिसांपासून कसा पळत होता?
पंजाबमध्ये कोट्यवधींच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरज अरोरा याला पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेनंतर अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली.
कोट्यवधींच्या नेचर हाइट्स इन्फ्रा घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी गेल्या आठवड्यात कारवाई करत नीरजला अटक केली.
नीरज अरोरा गेल्या 9 वर्षांपासून फरार होता.
पोलिसांपासून वाचण्यासाठी प्लास्टिक सर्जरी करण्याच्या विचारात तो होता, अशी माहिती समोर आली आहे.
पंजाबच्या फरीदकोट आणि फाझिल्का पोलिसांनी नीरजला उत्तराखंडच्या पौडी जिल्ह्याच्या श्रीनगर गढवालमधून अटक केली.
आरोपीकडं मध्य प्रदेशात 1200 एकरहून जास्त जमीन आणि 200 फ्लॅट आहेत. त्यांचं मूल्य 1,000 कोटींपेक्षा जास्त असल्याची माहिती पंजाब पोलिसांनी दिली.
7 लाखांपासून 100 कोटींपर्यंतची उडी!
पंजाब पोलिसांच्या माहितीनुसार, नीरज अरोराचे वडील गुप्तचर विभागात निरीक्षक पदावर होते. तर आई शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या.
एमबीएपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर नीरज अरोरानं मित्र प्रमोद नागपाल यांच्या साथीनं साबण, चहा आणि इतर दैनंदिन वापराच्या किराणा वस्तुंच्या विक्रीचा छोटा व्यवसाय सुरू केला.
“नीरज अरोरानं एका खासगी नेटवर्किंग कंपनीतून करिअरची सुरुवात केली होती. त्याठिकाणी नेटवर्किंग बिझनेसबाबत तो खूप काही शिकला,” असं पोलिस तपासात समोर आलं.
2002 मध्ये नीरज अरोरानं तीन इतर सहकाऱ्यांबरोबर मिळून अवघ्या 7 लाखांच्या गुंतवणुकीतून नेचरवे नेटवर्किंग कंपनी नावाची फर्म सुरू केली. त्यानंतर 10 वर्षांतच कंपनीचा टर्नओव्हर 100 कोटींच्या पुढं गेला. 2003 पर्यंत त्यांचा किराणा व्यवसाय राजस्थानपर्यंत पसरला होता.
2011 मध्ये भारताच्या 12 राज्यांमध्ये नेचर वे च्या उत्पादनांचे जवळपास 400 स्टोअर होते.
“नीरजनं पंजाब आणि राजस्थानात नेचरवेसाठी एजंट आणि ग्राहकांचं नेटवर्क तयार करण्यासाठी 16 लाख किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास केला. त्यामुळं मोठं नेटवर्क तयार करण्यात त्याला यशही आलं,” असं फरीदकोट पोलिसांच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं.
“या नेटवर्कमधील प्रत्येक एजंटनं जास्तीत जास्त लोकांना कंपनीचे ग्राहक बनवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. त्यामुळं कंपनीच्या कमिशनमध्ये वाढ झाली,”असं ते म्हणाले.
“नेचरवे कंपनी 500 किराणा आणि इतर उत्पादनांची विक्री करत होती. 2012 पर्यंत कंपनीची कामगिरी चांगली झाल्याचं दिसून आलं. त्यातही रंजक बाब म्हणजे, नीरज अरोराला 2013 मध्ये आदर्श करदात्याचा पुरस्कार मिळाला होता,” अशी माहितीही या अधिकाऱ्यांनी दिली.
कशी करायचा लोकांची फसवणूक?
पंजाब पोलिसांच्या माहितीनुसार, नेचरवे फर्मच्या यशानंतर नीरजनं अमित कुक्कड आणि प्रमोद नागपाल यांच्यासह इतर सहकाऱ्यांबरोबर रियल इस्टेट व्यवसाय सुरू केला.
त्यांनी 2012 मध्ये नेचर हाइट्स इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड नावाने फर्म स्थापन केली.
“नेचरवेच्या यशामुळं नीरजची जनता आणि गुंतवणूकदार यांच्यात चांगली प्रतिमा निर्माण झाली होती. लोकांनी त्यांच्या व्यवसायात गुंतवणूक करायला सुरुवात केली होती. या गुंतवणूक करणाऱ्यांना कमी काळात जास्त पैसे कमवून देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं,” अशी माहितीही फरीदकोट पोलिसांनी दिली.
पोलिसांच्या मते, “नीरजनं 2013 आणि 2015 दरम्यान पंजाबच्या विविध जिल्ह्यांत मालमत्ता खरेदी केल्या. पण जेव्हा त्यांना लोकांना मालमत्ता वितरण करण्यात अपयश येऊ लागलं तेव्हा लोकांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर त्यांच्या विरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या. त्यानंतर त्यांच्या विरोधात संपूर्ण पंजाबमध्ये अनेक एफआयआर दाखल झाले.”
नीरज अरोरानं नियोजनबद्धरित्या वैयक्तिक लाभासाठी गुंतवणूकदारांना फसवल्याचं तपासात समोर आलं आहे, असं फरीदकोट पोलिसांनी सांगितलं. कंपनी अनेक मोक्याच्या ठिकाणी स्वस्तात प्लॉट विक्री करण्याचा दावा करायची. पण अनेक ठिकाणी तर स्थानिक प्रशासनानं जमिनीला मंजुरीही दिलेली नसायची, हे नंतर समोर आलं,” असंही ते म्हणाले.
“आम्हाला होशियारपूरमध्ये जी 4 एकर जमीन दिली जाणार होती, तिचा करार इतर 4 जणांशी करण्यात आलेला होता, हे आम्हाला नंतर समजलं,” असं जज सिंग नावाचे गुंतवणूकदार म्हणाले.
“या कंपनीनं गुंतवणूकदारांना प्लॉट वितरीत केले नाही आणि पैसेही परत केले नाहीत. उलट कंपनीनं दिलेले चेकही बाऊन्स झाले. कंपनीनं संपूर्ण पंजाबमधून ग्राहकांकडून कोट्यवधी रुपये गोळा केले होते. नंतर कंपनीची सगळी कार्यालयं बंद करण्यात आली.”
“करारात ठरलेल्या किमतीपेक्षा कमी किमतीमध्ये प्लॉट किंवा जमीन खरेदी करण्यास ग्राहक तयार नसायचे त्यामुळं ग्राहकांनी पैसे देणं थांबवलं,” असं एसएसपी प्रज्ञा जैन म्हणाल्या.
“ग्राहकांनी पैसे देण्याऐवजी करारातील उर्वरित हप्त्यांचा परतावा मागायला सुरुवात केली. पण पैसे करण्याऐवजी नेचर हाइट्स कंपनीनं त्यांना न्यायालयीन कारवाई करण्यास सांगितलं.
प्लास्टिक सर्जरी का करू शकला नाही?
“नीरज अरोरानं अटकेपासून वाचण्यासाठी पंजाबच्या पठानकोट जिल्ह्याच्या पासपोर्टसह अनेक बनावट कागदंपत्रं तयार केली होती. नीरज फरार असताना चंदिगड, देहराडून आणि मुंबईत राहत होता. बनावट पासपोर्टवर त्यानं थायलंड, कंबोडिया अशा देशांचा प्रवासही केला होता,” असं पोलिस उपअधीक्षक इकबाल सिंह यांनी सांगितलं.
पोलिसांना नीरजकडे प्लास्टिक सर्जनशी संबंधित काही माहिती मिळाली आहे. त्यानंतर नीरज प्लास्टिक सर्जरीद्वारे चेहरा बदलण्याच्या विचारात होता, असं तपासात समोर आलं आहे. पण पुरेसा पैसा नसल्यानं त्याला तसं करता आलं नाही.
अटक कशी झाली?
“आम्ही एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला नीरज अरोराच्या वहिणी मेनका तुली यांना अटक केली होती. त्यानंतर आम्ही नीरज अरोराचा शोध लावला. तो उत्तराखंडमध्ये एका घरात राहत होता,” अशी माहिती फरीदकोट पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
अटकेच्या भीतीनं नीरज फोनचा वापर करत नव्हता. तसंच त्यानं नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांशी संबंधही तोडले होते, असंही त्यांनी सांगितलं.
“या प्रकरणाच्या तपासासाठी आम्ही एक विशेष पथक तयार केलं होतं. ते एका महिन्यापासून काम करत आहे. एसएसपी फाझिल्का प्रज्ञा जैन यांच्याकडूनही आम्हाला महत्त्वाची माहिती मिळाली. त्यामुळंच आम्ही मोस्ट वाँटेड नीरज अरोराला अटक करू शकलो,” असं फरीदकोटचे वरीष्ठ पोलिस कॅप्टन हरजित सिंह यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं
21 जिल्ह्यांत 108 गुन्हे
डीएसपी इक्बाल सिंह संधू यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नीरजच्या विरोधात पंजाबमध्ये लोकांकडून पैसे किंवा प्लॉटचं आमीष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी 21 जिल्ह्यांत 108 गुन्हे दाखल आहेत.
एकूण 108 एफआयआरपैकी 47 फाझिल्कामध्ये, आठ फिरोझपूरमध्ये, पटियाला आणि फतेहगढ साहीबमध्ये प्रत्येकी सहा, रूपनगर, मोहाली आणि एसएएस नगरमध्ये प्रत्येकी पाच, फरीदकोट, श्री मुक्तसर साहीब आणि जालंधरमध्ये प्रत्येकी चार आणि आयुक्तालयात चार प्रकरणं दाखल करण्यात आली आहेत,” असंही ते म्हणाले.
‘फाझिल्हा पोलिसांनी नीरज अरोराला फेब्रुवारी 2016 मध्ये अटक केली होती. पण जामीन मिळाल्यानंतर तो फरार झाला होता,’ अशी माहिती फरीदकोट पोलिसांनी दिली.
ईडीनं नीरज आणि त्याच्या सहकाऱ्यांची संपत्तीही जप्त केली आहे.
अंमलबजावणी संचलनालय (ईडी) नं नीरज आणि त्यांच्या कंपनीतील जवळपास 22 कोटी रुपयांची मालमत्ता आणि बँकेतील रक्कमही जप्त केली आहे.
ईडीनं या प्रकरणी 2017 मध्ये तपास सुरू केला होता. त्यावेळी गुंतवणूकदारांकडून 491 आणखी तक्रारी मिळाल्या होत्या.
‘आयुष्याची कमाई गुंतवली’
फरीदकोट जिल्ह्यातील जज सिंग यांनीही नेचर हाइट्स इन्फ्रा लिमिटेडमध्ये गुंतवणूक केलेले जवळपास 91 लाख रुपये गमावले आहेत.
“आम्ही 2012 मध्ये नीरज अरोरा यांच्या संपर्कात आलो. तेव्हा आमच्याकडं जमिनीसाठीचे आणि सेव्हिंगचे पैसे होते. तेच आम्ही त्यांच्या फर्ममध्ये गुंतवले,”असं जज सिंह बीबीसीबरोबर फोनवरून बोलताना सांगितलं.
“नीरजनं 2017 मध्ये आम्हाला 4 एकर जमीन देणार असं सांगितलं होतं. त्यावर आम्ही बागा लावणार होतो. तसंच महिन्याला 50 हजार रुपये देणार असं सांगण्यात आलं होतं. सुरुवातीची काही वर्ष ते चेक द्यायचे. पण काही काळानंतर त्यांचे चेक बाऊन्स होऊ लागले,” असं त्यांनी पुढं सांगितलं.
“आम्ही आयुष्यभराची कमाई गुंतवली होती. त्यात आमचे 91 लाख रुपये गेले. फसवणुकीमुळं आमचं मोठं नुकसान झालं. शिवाय लज्जास्पद प्रकार वाटत होता, त्यामुळं आम्हाला नातेवाईकांनाही सांगता येत नव्हतं,” असं जज सिंह म्हणाले.
“सरकारकडून मिळालेले परवाने आणि परवानगी याच्याशी संबंधित कागदपत्रं कंपनीनं दाखवली होती, त्यामुळं आम्ही कंपनीत गुंतवणूक केली. त्यामुळं गुंतवणूकदारांच्या हितांचं संरक्षण करणं हे संबंधित सरकारचं कर्तव्य नाही का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.