जुलै २०२३ ते मे २०२४ या काळात शिवसेना पुन्हा बलवान होईल’
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज ६२ वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातील तमाम शिवसैनिक मातोश्रीबाहेर उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी गर्दी करत आहेत.
पण उद्धव ठाकरे यांना सध्या मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. सेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्याने त्यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं. तर मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) विराजमान झाले आहेत. सेनेतील ४० आमदार आणि १२ खासदारांनी पक्ष सोडल्याने त्यांच्यासमोर नवा पेच निर्माण झाला आहे. शिवसेना पक्ष ठाकरेंचा राहिल का असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शिवसेनेचं भविष्य काय असेल, उद्धव ठाकरेंचं भविष्य काय असेल. तसेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची कुंडली काय सांगते यावर प्रसिद्ध ज्योतिषींनी महत्वपूर्ण भाष्य केलं आहे.
अनिकेत शास्त्री म्हणाले, ‘उद्धव ठाकरे यांची सिंह ही जन्मरास असून सध्या फार त्रासदायक आहे. ते सर्व भारताने बघितले आहे. उद्धव ठाकरेंचा येणार काळ कसा असेल, काही ग्रंथाच्या अनुसार उद्धव ठाकरे यांच्या कुंडलीत ३८ प्रकारचे योग बनत आहे. यामध्ये काही योग हे शुभ आहेत. तर काही अशुभ आहेत. तसेच काही पंचमहापुरूष राजयोग आहेत. अशुभ योगामध्ये अरिष्ट राजभ्रष्ट नावाचे योग होत आहेत. हा योग फलदिपीका या ग्रंथाच्या अनुसार उदीत होत आहे. त्याला अनुसरुन दैन्य नावाचा योग आहे. या योगानुसार या व्यक्तीची प्रतिष्ठा मातीत मिळण्याची शक्यता आहे किंवा मोठ्या पदावरून पायउतार व्हावं लागेल. असं त्याचं फळ आहे.
ज्योतिषी राजकुमार शर्मा म्हणाले, ‘उद्धव ठाकरे यांच्यावर गुरूची महादशा सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी पुढील ४० ते ४२ दिवस चांगले नसणार आहेत. त्यांच्यासोबत बसणारे २-४ जण त्यांना सोडून जावू शकतात. मात्र, ५ सप्टेंबर नंतर उद्धव ठाकरे शिवसेनेला वाचवण्यासाठी सक्षम होतील’.
ज्योतिषी सिद्धेश्वर मारटकर म्हणाले की,उद्धव ठाकरे यांच्या पत्रिकेनुसार, ज्यावेळी त्यांना मुख्यमंत्रिपद मिळाले, त्यावेळी त्यांच्यावर महादशा सुरू होती, ती नोव्हेंबर २०१९ पर्यंत सुरू होती. त्यानंतर अंर्तदशा सुरू झाल्याने गोंधळ झाला आहे. नोव्हेंबर २०१९ ते जुलै २०२३ हा काळ त्यांच्यासाठी नकारात्मक राहणार आहे. त्यांच्यावर काही दिवसांपूर्वी अनेक आरोप झाले आहेत. त्यांच्या सहकाऱ्यांवर आरोप झाले. तसेच काही सहकारी रागावले, रुसले. त्याच्यातून मोठा परिणाम झाला. मंगळ-राहू एकत्र आल्याने त्यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं. त्यात शिवसेनेची पत्रिका देखील खराब झाली. महाविकास आघाडीची स्थापना कुंडली आहे, त्याच्यातही दशम स्थानावर शनी आला आहे. या साऱ्यांचा परिणाम झाला आहे. २०२३ नंतर उद्धव ठाकरे पुन्हा आपला पक्ष सावरू शकेल. आता शिवसेना पक्षाचं पुनर्वसन होत आहे. जुलै २०२३ ते मे २०२४ या काळात शिवसेना पुन्हा बलवान होईल’.