मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार नाही.; एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसींचा दावा
छत्रपति संभाजीनगर : नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार नाहीत, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यासाठी आम्ही भाजपविरोधी पक्षांना एकत्र करत आहोत, असा दावा ऑल इंडिया मजलित-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केला आहे.
मिरारोड येथे झालेल्या घटना काही लहान नाही, तिथे पोलिस बंदोबस्तात बुलडोझर लावून दुकाने आणि घरं पाडण्यात आली. मात्र त्यावेळी धर्मनिरपेक्षतेचे ठेकेदार कोणीही तिथे गेले नाही, असे म्हणत ओवैसींनी काँग्रेस नेत्यांवर टीका केली. अकोला येथील सभेला जाण्यापूर्वी खासदार ओवैसींनी माध्यम प्रतिनिधींशी वार्तालाप केला.
नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार नाहीत. जनतेमध्ये त्यांच्याबद्दल राग आहे. रोजगार, महागाई, शेतकरी सर्वच मुद्यांवर ते अपयशी ठरले आहेत. देशात मुस्लिमांची अवस्था जर्मनीतील यहूदींसारखी करुन ठेवली आहे, असा आरोप खासदार ओवैसींनी केला. मोदी अजमेर शरीफ येथील दर्ग्यावर चादर चढवतात, मग आमच्या मशिदी पाडत असताना त्यांची श्रद्धा कुठे जाते. आजमेरला चादर चढवणं त्यांना पवित्र वाटतं, मग आमच्या मुलींचे हिजाब काढून घेतले जातात तेव्हा त्यांना काहीच का वाटत नाही, आमच्याकडून मशिदी हिसकावून घेण्याचे हे मोदींचे कुठले प्रेम आहे, असा सवाल ओवैसींनी केला.
इंडिया आघाडीत एमआयएम सहभागी होणार का, या प्रश्नावर एमआयएमचे प्रमुख म्हणाले, इंडिया आघाडीचे आम्हाला निमंत्रण आले नाही, मात्र या उलट आम्हीच त्यांना ऑफर दिली होती. खासदार इम्तियाज जलील यांनी स्वतः त्यासाठी पुढाकार घेतला होता, मात्र इंडिया आघाडीकडून प्रतिसाद मिळाला नाही. इंडिया आघाडीने आयडियालॉजीवर भाजपशी लढले पाहिजे. मात्र त्यावर ते बोलायला तयार नाहीत. मुस्लिमांवर देशभरात ठिकठिकाणी अन्याय, अत्याचर होत आहे, त्यावर ते बोलत नाही. महाराष्ट्रात लव्ह-जिहादच्या नावाने 50 हून अधिक सभा-मोर्चे निघाले, त्यातून कोणत्या प्रकारची भाषा अल्पसंख्याकांबद्दल वापरण्यात आली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाला मध्यस्थी करावी लागली मात्र शिंदे सरकारने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. भारतीय संविधानाची पायमल्ली करत बहुमताच्या जोरावर आम्ही काहीही करु हाच फॅसिझम फोफावत आहे. यावर इंडिया आघाडीचे नेते बोलायला तयार नाही. त्यांचे म्हणणे आहे की तुम्ही अंधळे, बहिरे आणि मुके होऊन राहा आणि निवडणुका आल्या की धर्मनिरपेक्षतेसाठी आम्हाला मतदान करा, असा टोला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना लगावला.