उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीला सोडलं पाहिजे – रामदास कदम
मुंबई : शिवसेनेचे माजी नेते रामदास कदम यांची काल उद्धव ठाकरे यांनी पक्षातून हकालपट्टी केली. त्यानंतर कदम यांनी माध्यमांसमोर आपली नाराजी व्यक्त केली आहे. मी शिवनेसाठी मोठा संघर्ष केला आणि उद्धव ठाकरे यांनी माझी हकालपट्टी केली असं म्हणत कदम हे माध्यमांना बोलताना रडले आहेत.
राणे, राज ठाकरे, छगन भुजबळांनी शिवसेना सोडली तेव्हा मी संघर्ष केला आणि ते आज माझी हकालपट्टी करतात. असं म्हणत रामदास कदम यांनी नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांच्या आमदारावरील टीकेवर बोट ठेवत त्यांनी निशाणा साधला आहे.
मागच्या अडीच वर्षापासून शिवसेना कशी संपवायची याचं कटकारस्थान शरद पवार आणि अजित पवार यांनी केलं आहे पण तुम्ही शरद पवारांना सोडलं नाही असं म्हणत त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे. शिंदेसोबत गेलेल्या आमदारांचे मी आभार मानतो असंही मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.
शिंदेसोबत गेलेल्या आमदारांवर किती टीका केली गेली, खालच्या पातळीवर जाऊन बोललं गेलं. बैलं, बोकडं, कुत्रे असं म्हणत त्यांना हिणवलं गेलं पण त्यांना हे शोभतं का? त्या आदित्यचं वय काय आणि तो कोणत्या भाषेत आमदारांना बोलतोय? याचं जरा भान ठेवायला पाहिजे… असं म्हणत रामदास कदम यांनी माध्यमांशी बोलताना नाराजी व्यक्त केली.
त्याचबरोबर रामदास कदम यांची ठाकरे यांनी काल पक्षातून हकालपट्टी केली त्यावर बोलताना ते म्हणाले की, तुम्ही हकालपट्टी करण्याच्या अगोदर मी माझा राजीनामा दिला. तुम्ही काय मला काढून टाकणार असं म्हणत अजूनही मला शिवसेनेचा काळजी असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीला सोडलं पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.