गॅस एजन्सीच्या कॅशियरवर हल्ला करून 12.57 लाखाची लूट
नागपूर : नागपूरमध्ये दुचाकीवर आलेल्या दरोडेखोरांनी गॅस एजन्सीच्या कॅशियरवर हल्ला करून 12.57 लाख रुपये रोख लुटून पळ काढल्याची घटना घडली आहे. वाडी पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या डिफेन्स क्वार्टर संकुलात भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे ऐन हिवाळी अधिवेशनापूर्वी ही घटना घडल्याने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सिद्धार्थ रामचंद्र सुखदेव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.
डिफेन्स क्वार्टरमधील तुळशी चौकात एचपी कंपनीची गॅस एजन्सी आहे. फिर्यादी सिद्धार्थ हे गेल्या 40 वर्षांपासून येथे काम करत आहेत. एजन्सीच्या व्यवस्थापन आणि आर्थिक व्यवहारांची जबाबदारी त्यांच्याकडे आहेत. एजन्सीचे बँक खाते संरक्षण संकुलात असलेल्या युको बँकेच्या शाखेत आहे. शनिवार आणि रविवारी बँका बंद असल्याने एजन्सीकडे जमा झालेली सर्व रोकड कार्यालयातच ठेवण्यात आली होती.
दोन तरुणांनी थांबण्याचा इशारा
दरम्यान सोमवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सिद्धार्थ ऑफिसला पोहोचले. सकाळी 10.30 च्या दरम्यान ते बॅगेत 2.57 लाख रुपये घेऊन बँकेत जमा करण्यासाठी जात होते. तेवढ्यात तेथे 300 मीटर अंतरावर दुचाकीवरून येणाऱ्या दोन तरुणांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला. त्याच्याकडे मोठी रक्कम असल्याने सिद्धार्थ यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान मागच्या सीटवर बसलेल्या तरुणाने त्याच्या डोक्यावर काठीने वार केले. यामुळे त्यांचा तोल गेला आणि दुचाकीसह ते रस्त्यावर पडले. तेवढ्यात आरोपींनी त्यांच्याकडील पैशांची बॅग हिसकावून फरार झाले.
सिद्धार्थ यांनी मदतीसाठी आरडाओरडा केली
यानंतर सिद्धार्थ यांनी मदतीसाठी आरडाओरडा केली. मात्र तोपर्यंत आरोपी तेथून पळून गेले होते. यानंतर त्यांनी मालकाला आणि पोलीस नियंत्रण कक्षाला घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सिद्धार्थला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात लावलेल्या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज स्कॅन केले. फुटेजमध्ये 2 तरुण दिसत आहेत. एका टिपच्या आधारे हा गुन्हा घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. एजन्सीचे आर्थिक व्यवहार केवळ सिद्धार्थच हाताळतात याची माहिती आरोपींना होती. त्यामुळे कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांचीही पोलीस चौकशी करत आहेत.