नामदेव जाधव यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं
नामदेवराव जाधव हे प्राध्यापक,लेखक आणि व्याख्याते आहेत. त्यांनी ‘शिवाजी द मॅनेजमेंट गुरु’ हे पुस्तक लिहिलं आहे. तसंच आपण जिजाऊंचे वंशज आहोत असा दावा त्यांच्या फेसबुक पेज आणि X या सोशल मीडिया साईटवर केला आहे. मात्र जिजाऊंच्या वंशजांनी ते तोतया असल्याचा आरोप केला आहे.
पुणेः पुण्यात प्राध्यापक नामदेव जाधव यांना काळं फासण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी नामदेव जाधव प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना काळं फासत निषेध नोंदवला.
नामदेव जाधव यांनी शरद पवारांविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी काळं फासण्यात आलं. शरद पवार यांच्या जात प्रमाणपत्रावर कुणबी नोंद असल्याचा दावा नामदेव जाधव यांनी केला होता. तसंच शरद पवार यांच्याविरोधात वक्तव्य केलं होतं. याविरोधात आक्रमक होत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना नामदेव जाधव यांना गाठलं आणि काळं फासत घोषणा दिल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून विरोध झाल्यानंतर नामदेव जाधव यांचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. यानंतर पुण्याच्या पत्रकार भवनबाहेर ते प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत होते. “लोकशाहीत विचार मांडण्याचा अधिकार आहे. कार्यक्रमाला परवानगी नाकारल्याने आपण पाकिस्तान, अफगाणिस्तानमध्ये राहतो का असा प्रश्न निर्माण होतो. मी पोलिसांकडे विचारणा करणार आहे. जर मी पुरावे घेऊन बोलतोय तर तुम्ही पण तसेच बोलले पाहिजे. विचारांची लढाई आहे विचाराने लढली पाहिजे,” असं यावेळी त्यांनी सांगितलं.
दरम्यान ते बोलत असतानाच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळं फासलं. यावेळी काहींनी त्यांच्यावर हातही उचलला. यावेळी सुरक्षेसाठी तैनात पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना कार्यकर्त्यांपासून वाचवलं आणि गाडीत बसवलं.
शरद पवार ओबीसी असल्याचा केला होता दावा
शरद पवार ‘ओबीसी’ असल्याचा दावा नामदेव जाधव यांनी केला होता. नामदेव जाधवांनी सोशल मीडियावर एक प्रमाणपत्र शेअर केलं होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही यावर प्रतिक्रिया देत सुनावलं होतं.
“हे अत्यंत चुकीचं प्रमाणपत्र आहे. नामदेव जाधव प्रसिद्धीसाठी शरद पवारांबद्दल गैरसमज पसरवत आहेत. तसेच, पवारांना बदनाम करण्याचा उद्योग करत आहेत. मूळ मुद्द्यावर लक्ष विचलित करण्यासाठी हा प्रयत्न दिसतोय. शरद पवारांच्या शाळेतील दाखल्यावर ‘मराठा’ म्हणून उल्लेख आहे,” असं जयंत पाटील म्हणाले होते. “कुणीही शरद पवारांच्या प्रमाणपत्रावर बदल करून काहीही दाखवत असतील, तर महाराष्ट्रातून कार्यकर्ते तक्रारी दाखल करत आहेत. त्यामुळे चुकीचं पसरवणारे तक्रारींना तोंड देतील,” असा इशारा जयंत पाटलांनी दिला होता.