नोटांवर महात्मा गांधीचं चित्र केव्हापासून छापण्यात येतंय? नोटांवर छापण्यात येत असलेलं गांधीजींचं चित्र नेमकं कुठलं आहे?
नोटांवर महात्मा गांधीचं चित्र केव्हापासून छापण्यात येतंय? नोटांवर छापण्यात येत असलेलं गांधीजींचं चित्र नेमकं कुठलं आहे?
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुरुवातीला भारतीय चलनांवर महात्मा गांधींचं चित्र नव्हतं. मात्र, नंतरच्या काळात सर्वच नोटांवर महात्मा गांधींचं चित्र छापण्यात येऊ लागलं.
पण कधी विचार केला आहे का, नोटांवर महात्मा गांधीचं चित्र हा केव्हापासून छापण्यात येतंय? नोटांवर छापण्यात येत असलेलं गांधीजींचं चित्र नेमकं कुठलं आहे? तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, भारतीय नोटांवर महात्मा गांधींचं चित्र हा छापण्यास सुरुवात करून अद्याप 30 वर्षंदेखील पूर्ण झालेली नाहीत.
भारतीय चलनी नोटांवर महात्मा गांधीजींच्या चित्रापूर्वी अशोकस्तंभाचं चित्र असायचं. मात्र, त्या पूर्वी ब्रिटनचे किंग जॉर्ज पाचवे यांचं चित्र नोटेवर होतं. विशेष म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यानंतरही ब्रिटिश राजा जॉर्ज पाचवा याचं चित्र असलेलं चलन दोन वर्षं भारतात चलनात राहिलं. या वेळी रुपयाची गणना 16 अणे एवढी केली जात होती, परंतु 1957 नंतर ही प्रणाली रुपयामध्ये बदलली गेली. एक रुपया म्हणजे 100 पैसे असं रूपांतरण झालं.1949 मध्ये राजाचं चित्र बदलून नोटांवर अशोकस्तंभ छापण्यात आला. पुढे काळानुसार बदल होत असताना नोटांचा रंग आणि स्वरूप दोन्ही बदलले. आता तर प्रत्येक नोटेवर महात्मा गांधी यांचं चित्र छापण्यात येतं, ‘जागरण जोश’ने या बाबत वृत्त दिलंय.
1996 मध्ये छापण्यात आलं चित्र
महात्मा गांधींचं चित्र भारतीय चलनावर केव्हापासून छापण्यात येत आहे, याबाबत माहिती अधिकारात माहिती समोर आली आहे. एका आरटीआयला उत्तर देताना केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं म्हटलं होतं की, नोटेच्या उजव्या बाजूला गांधीजींचं चित्र छापण्याची शिफारस आरबीआयनं 13 जुलै 1995 रोजी केंद्र सरकारला केली होती. यानंतर आरबीआयनं 1996 मध्ये नोटा बदलण्याचा निर्णय घेतला, आणि अशोकस्तंभाच्या जागी राष्ट्रपिता महात्मा गांधींचं चित्र छापण्यात येऊ लागला.
पण तेव्हा अशोकस्तंभ चलनी नोटांमधून काढला गेला नसून, तो नोटांच्या खालच्या डाव्या बाजूला छापण्यात येऊ लागला आहे. या आरटीआयला उत्तर देताना आरबीआयनं असेही सांगितलं होते की, नोटांवर हा चित्र छापण्याचा निर्णय सरकारनं केव्हा घेतला, व त्याची अंमलबजावणी कधीपासून झाली, म्हणजेच भारतीय नोटांवर महात्मा गांधींचं चित्र छापण्याचं काम कोणत्या तारखेपासून सुरू झाले, याची माहिती उपलब्ध नाही.
कलकत्ता येथे काढला होता चित्र
विशेष म्हणजे नोटांवर असलेले गांधीजींचं चित्र हा कॉम्प्युटरद्वारे तयार केलेलं नाही, तर ते गांधीजींचं मूळ फोटो आहे. हा फोटो कलकत्ता येथील व्हाईसरॉय हाऊस येथे काढण्यात आला होता. 1946 च्या आसपास गांधीजी ब्रिटिश सचिव फ्रेडरिक पेथिक लॉरेन्स यांना भेटायला गेले होते. या वेळी हा फोटो काढण्यात आला आहे. या फोटोवरून, भारतीय चलनी नोटांवर गांधीजींचा चेहरा पोर्ट्रेट स्वरूपात चित्रित करण्यात आला आहे, आता तो भारतीय चलनाचा ट्रेडमार्क देखील आहे.
भारतातील चलनी नोटा छापण्याचा अधिकार कोणाला?
भारताची मध्यवर्ती बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे. एक रुपयाची नोट वगळता सर्व मूल्यांच्या नोटा छापण्याचा अधिकार या बँकेला आहे. आरबीआयला हा अधिकार आरबीआय कायदा, 1934 अंतर्गत देण्यात आला आहे. तर त्या कायद्याचे कलम 24(1) अंतर्गत आरबीआयला एक रुपयाची नोट छापण्याचा अधिकार नाही. चलन अध्यादेश, 1940 च्या नियमांनुसार, एक रुपयाची नोट भारत सरकार मुद्रित करते. तर, दोन रुपये ते 2000 रुपयांपर्यंतचे चलन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे मुद्रित केली जातात. विशेष म्हणजे रिझर्व्ह बँक 10,000 रुपये मूल्यापर्यंतच्या नोटा छापू शकते. आपल्या देशात एक रुपयाची नोट अर्थ मंत्रालय छापते. त्यामुळे त्यावर आरबीआय गव्हर्नरची नव्हे, तर अर्थ सचिवांची स्वाक्षरी आहे. दरम्यान काळानुसार भारतीय चलनाचं स्वरूप हे बदलत गेलं आहे. आगामी काळामध्येही हे स्वरूप बदलत जाईल, असा अंदाजही लावला जातो.