नागभूमी शिराळा
नागपंचमीमुळे शिराळा गाव जगाच्या नकाशावर आले. देश-विदेशातील पर्यटक व प्रसारमाध्यमांमुळे यामुळे नागपंचमी जगभर पोहोचली. नागपंचमी पर्यावरणवाद्यांना विविध बंधनात साजरी करावी लागते. न्यायालयाच्या आदेशानुसार जिवंत नागपूजा व नागस्पर्धा बंद करण्यात आली आहे.
न्यायालयाने घालून दिलेल्या आदेशानुसार प्रतिमांचे पूजन, प्रतिकात्मक नागाची मिरवणूक काढण्यात येते. नागपंचमी उत्सवात धार्मिकता व संस्कृती असून अंधश्रद्धा नाही. शिराळा येथे सर्पदंशावरील उपचाराचा मोठा साठा असतो. नागपंचमी शिवाय जरी नाग दिसला, तरी तो वनखात्याच्या देखरेखीखाली पकडून त्याला इजा न होता जंगलात सोडून देण्यात येतो.
शिराळ्याच्या नागपंचमी उत्सवात प्राचीन इतिहास आहे. प्राचीन काळात श्री गोरक्षनाथ देशाटन करताना शिराळा येथे आले. ते नाथसंप्रदायी होते. भ्रमंती करून उदरनिर्वाह करावयचा असा एक दंडक होता. एका ठिकाणी तीन दिवसापेक्षा जास्त काळ राहावयचे नाही. ते शिराळ्यात आले, त्यावेळी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या मोरणा व तोरणा नदीकाठी संगमावर वास्तव्यास होते. भिक्षा मागत ते महाजन यांच्या घरासमोर आले. माई भिक्षा वाढ, अशी आरोळी दिली. महाजन यांच्या घरातील गृहणी मातीच्या नागाची पूजा करत होती. यामुळे भिक्षा वाढण्यासाठी वेळ झाला, असे त्या गृहिणीने सांगितली. गोरक्षनाथ यांनी तू जिवंत नागाची पूजा करशील का, असे विचारले असता तिने होकार दिला.
गोरक्षनाथ यांनी आपल्या विद्येच्या जोरावर मातीच्या नागास जिवंत केले. यापासून तुला भय नाही, असे सांगितले. तेव्हापासून येथे जिवंत नागाची पूजा सुरू झाली, अशी आख्यायिका आहे. ही शेकडो वर्षांची परंपरा शिराळकर आजही जोपासत आहेत. नागपंचमी उत्सवाबाबत मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या संग्रहात कागदपत्रे सापडली आहे. सन 1869 मध्ये नागपंचमीवर संशोधन झाले. तर 1848 मध्ये शिराळाहून नाग आणल्याची कागदपत्रे उपलब्ध झाली आहे. शिराळा नागपंचमीला परंपरा व इतिहास आहे.
आजही नागपंचमी दिवशी हजारो भक्त अंबामाता मंदिरात दर्शनासाठी येतात. बाहेर रहावयास असणारे शिराळकर उत्सवासाठी गावी येतात. शिराळातील मिरवणूक मार्गावर मोठा पोलिस बंदोबस्त असतो. वनखात्याचे अधिकारी व कर्मचारी गावात दाखल होत आहेत. नगरपंचायत प्रशासक मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी आरोग्य व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. तहसीलदार शामला खोत-पाटील, पोलीस निरीक्षक सिध्देश्वर जंगम यांनी नागमंडळे, पोलीस व वनखात्याच्या बैठका घेऊन नियोजन केले आहे.