ताज्या बातम्यामहाराष्ट्र

उद्यापासून अधिक श्रावण महिन्यास प्रारंभ; अधिकमासात काय केलं पाहिजे? जाणून घ्या…


यंदा मंगळवारपासून, म्हणजेच 18 जुलैपासून ते 16 ॲागस्ट 2023 पर्यंत अधिक श्रावणमास असणार आहे. अधिक मासाला पुरुषोत्तममास, मलमास किंवा धोंड्या महिना असंही म्हणतात.
अधिक श्रावणमासानंतर गुरुवार, 17 ॲागस्ट ते शुक्रवार, 15 सप्टेंबर 2023 पर्यंत निज श्रावणमास येणार आहे. श्रावणी सोमवारचे (Shravani Somvaar) उपवास, मंगळागौरी पूजन, नागपंचमी वगैरे असे श्रावण महिन्यातील सर्व सण-उत्सव-व्रतं ही अधिक श्रावणमासात न करता निज श्रावणमासातच करायची आहेत.

पंचांगात चांद्र आणि सौर पद्धतीचा मेळ घालण्यासाठी एक नियम तयार करण्यात आला आहे. मीन राशीत सूर्य असताना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होईल, त्याला चैत्र म्हणतात. मेष राशीत सूर्य असताना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होईल, त्याला वैशाख म्हणतात. कधी कधी एका राशीत सूर्य असताना दोन चांद्र महिन्यांचा प्रारंभ होतो. त्यावेळी पहिला तो अधिकमास आणि दुसरा तो निजमास म्हणून धरला जातो.

आता यावर्षीच पाहा… रविवार, 16 जुलै 2023 रोजी उत्तररात्री 5 वाजून 6 मिनिटांनी सूर्य कर्क राशीत प्रवेश करत आहे. नंतर गुरुवार, 17 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजून 32 मिनिटांनी सूर्य सिंह राशीत प्रवेश करत आहे. या काळात दोन चांद्र महिन्यांचा प्रारंभ होत आहे, त्यामुळे अधिक श्रावण आणि निज श्रावण अशी दोन नावं देण्यात आली आहेत. आपणास असंही सांगता येतं की ज्या चांद्र महिन्यात सूर्याचा राशीबदल होत नाही, तो अधिक महिना धरला जातो. यावर्षीच पाहा… मंगळवार, 18 जुलै 2023 ते बुधवार, 16 ॲागस्ट 2023 या काळात सूर्याचा राशीबदल झालेला नाही, त्यामुळे श्रावण हा चांद्र महिना अधिकमास झाला आहे.

अधिक मासात काय करावं?

अधिक मासात संपूर्ण दिवस उपवास किंवा एक वेळ भोजन करावं. देवापुढे अखंड दीप लावावा. 33 अपूप म्हणजे अनारसे यांचं दान करावं. 33 अनारसे भगवान विष्णूला अर्पण करावेत, असं सांगितलं जातं, परंतु जावई हा विष्णूसमान मानला जातो आणि म्हणून अधिक मासात जावयाला 33 अनारशांचं दान देण्याची प्रथा सुरु झाली असावी. इथे 33 अंकाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. कारण तीन वर्षात वाढल्या गेलेल्या 33 तिथी मानल्या जातात. अधिकमासात नित्य आणि नैमत्तिक कर्मं करावी. मात्र काम्य कर्माचा आरंभ आणि समाप्ती करु नये. केल्यावाचून गती नाही, अशी कर्म अधिक मासात करण्यास हरकत नाही. नामकर्म, अन्नप्राशन, नित्यश्राद्ध हे संस्कार अधिकमासात करायला हरकत नाही. मात्र देवप्रतिष्ठा, चौल, उपनयन, विवाह, संन्यासग्रहण, वास्तुशांती, गृहारंभ या गोष्टी अधिक मासात करु नयेत, असं सांगण्यात आलं आहे.

दान करा!

अधिकमासात दान करावं, असं सांगण्यात आलं आहे. भारतीय संस्कृतीत दानाचं विशेष महत्त्व आहे. दान म्हणजे ‘डोनेशन’ नव्हे. डोनेशन कोणी दिलं आणि डोनेशन काय दिलं ते जाहीर केलं जातं. परंतु दान कोणी दिलं आणि काय दान दिलं ते गुप्त ठेवायचं असतं. एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हातालाही कळता कामा नये, असं म्हटलं जातं. अधिक मासाच्या निमित्ताने समाजातील गरजू-गरीब लोकांना तसेच सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना मदत मिळावी, हा त्यामागचा उद्देश आहे.

या अधिक श्रावण महिन्यात अन्नदान, वस्त्रदान, जलदान, श्रमदान, धनदान, विद्यादान, फलदान, अनारसे दान करता येईल. शिवाय रक्तदान, नेत्रदान-अवयव दानाचा संकल्प करता येईल. आपण आनंदाने, समाधानाने जगायचेच आणि जास्तीत जास्त लोकांच्या जीवनात आनंद-समाधानाची बाग फुलवण्याचा प्रयत्न करायचा हाच यावर्षीच्या श्रावण अधिक महिन्याचा संदेश आहे.

यापुढील अधिकमास असे येणार आहेत

1) 17 मे ते 15 जून 2026 – ज्येष्ठ
2) 16 मार्च ते 13 एप्रिल 2029 – चैत्र
3) 19 ॲागस्ट ते 16 सप्टेंबर 2031 – भाद्रपद
4) 17 जून ते 15 जुलै 2034 – आषाढ
5) 16 मे ते 13 जून 2037 – ज्येष्ठ
6) 19 सप्टेंबर ते 17 ॲाक्टोबर 2039 – अश्विन
7) 18 जुलै ते 15 ॲागस्ट 2042 – श्रावण
8) 17 मे ते 15 जून 2045 – ज्येष्ठ
9) 15 मार्च ते 13 एप्रिल 2048 – चैत्र
10) 18 ॲागस्ट ते 16 सप्टेंबर 2050 – भाद्रपद


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button