नंदुरबार जिल्ह्याला चक्रीवादळाचा तडाखा; वादळी वाऱ्यांमुळे गेला एकाचा जीव
गुजरातमधून घोंगावत आलेल्या चक्रीवादळाचा रविवारी (ता. ४) नंदुरबार जिल्ह्याला जोरदार तडाखा बसला. या वादळामुळे घरे, शाळा आणि झोपड्यांवरील पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले असून, विजेचे खांबही वाकले आहेत. केळीच्या बागेतील खोड आडवे झाले असून, काढलेली केळीही पावसात सापडल्याने शहादा तालुक्यात मोठी हानी झाली आहे.
या चक्रीवादळात प्रतापपूर (ता. तळोदा) येथे धावत्या करावर वडाचे झाड कोसळून एक जण ठार, तर दुसरा जखमी झाला. दुसऱ्या एका घटनेत ३० मेंढ्यांचा मृत्यू झाला. नंदुरबार शहरात काही ठिकाणी वीजतारा घासल्याने आगीच्या घटना घडल्या.
गुजरातमध्ये अचानक तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे नंदुरबार तालुक्यात रविवारी दुपारी दोनच्या सुमारास गुजरातकडून आलेल्या चक्रीवादळाबरोबरच जोरदार पावसाला सुरवात झाली. वाऱ्याचा वेग खूपच जास्त असल्याने घरे, झोपड्या, काही शाळांवरील पत्रे कागदासारखी उडाली.
यामुळे अक्कलकुवा, धडगाव तालुक्यांतील वाड्या-पाड्यांवरील ग्रामस्थ उघड्यावर आले. शहादा तालुक्यालाही वादळाचा जोरदार फटका बसला. जवळपासा दोन तास वादळी वाऱ्याचा धिंगाणा सुरू होता. तळोदा शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी विजेचे खांब वाकले.
तळोदा-चिनोदा रस्त्यावर जोरदार वादळी वाऱ्यामुळे प्रतापपूर (ता. तळोदा) येथील राजेंद्र मराठे यांना जीव गमवावा लागला. ते प्रतापपूरहून आपल्या अर्टिगा गाडीने तळोद्याला येत होते. त्यादरम्यान अचानक वादळी वाऱ्यांना सुरवात झाली.
त्यांची गाडी चिनोदा रस्त्यावरील पुलाजवळ आली असता अचानक भल्या मोठ्या वडाचे झाड त्यांच्या गाडीवर पडले. यात गाडीचा पत्रा कापला गेल्याने ते जागीच ठार झाले. या घटनेची माहिती समजताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.