जलतरण तलावात पोहताना डॉक्टरचा बुडून मृत्यू
नागपूर : कळमेश्वर मध्ये बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास कळमेश्वर नगरपरिषदेच्या जलतरण तलावात बुडून तरुण डॉक्टराचा मृत्यू झाला. डॉ.राकेश दुधे असे मृत डॉक्टराचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कळमेश्वर येथील डॉ.राकेश दुधे (वय 41) हे बुधवारी नेहमीप्रमाणे कळमेश्वर नगरपरिषदेच्या जलतरण केंद्रात पोहण्यासाठी गेले होते. दरम्यान, सहा वाजण्याच्या सुमारास ते अचानक बुडू लागले.हा प्रकार कळताच तेथे उपस्थित त्यांचे साथीदार आणि प्रशिक्षकांच्या मदतीने डॉ.दुधे यांना बेशुद्धावस्थेत बाहेर काढण्यात आले.त्यांचा नाक-तोंडात पाणी भरल्याने ते बेशुद्ध झाले. त्यांना कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयात नेले असता प्राथमिक तपासातच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
2 महिन्यांपूर्वी सुरू झाले जलतरण तलाव
जलतरण तलावाचे बांधकाम पूर्ण होऊनही सुमारे ३ वर्षे हा पूल बंद असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी 23 मार्च रोजी या तलावाचे उद्घाटन करण्यात आले असून मात्र जलतरण तलाव सुरू झाल्यानंतर काही महिन्यांतच ही दुर्घटना घडली. सद्या या तलावाची संपूर्ण देखभालीची जबाबदारी नागपूरच्या साई अॅक्वाटिक कन्सल्टन्सीकडे देण्यात आली आहे. जलतरण केंद्रात महिला, पुरुष आणि लहान मुलांसह अशा एकूण 300 सदस्य आणि दोन प्रशिक्षकांचा समावेश आहे. तरुण डॉक्टरच्या मृत्यूचे वृत्त समजताच नागरिकांनी मोठ्या संख्येने जलतरण केंद्र गाठले. माहिती मिळताच कळमेश्वर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. कळमेश्वर पोलीस अधिक तपास करत आहेत.
प्रशिक्षक काय करत होते?
दरम्यान, उन्हाळी जलतरण शिबिर सुरू होते. म्हणूनच आजूबाजूला जीवरक्षक आणि प्रशिक्षक असणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत डॉ.राकेश दुधे बुडत असताना जीवरक्षक आणि प्रशिक्षक काय करत होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा
जलतरण केंद्रात पोहण्यासाठी येणाऱ्या लोकांसाठी कोणतीही सोय नाही. ठेकेदाराला पैसे देऊनही याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे तरुण डॉक्टरचा मृत्यू झाला. ठेकेदाराचा ठेका रद्द करताना न.प.प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.