कुटुंबप्रमुखाचे हितगुज!
‘मन की बात’ची १०० वी आवृत्ती येत्या ३० एप्रिलला प्रसारित होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आजवरच्या वाटचालीचे पुनरावलोकन..
लोकशाही व्यवस्थेत लोक आणि राज्यशकट चालविणारे सत्ताधीश यांच्यामधील संवादाला विशेष महत्त्व असते. आपल्याकडे राष्ट्रपती, राज्यपाल, पंतप्रधान वा मुख्यमंत्री सामान्यत: दर प्रजासत्ताकदिनी किंवा स्वातंत्र्यदिनी राष्ट्राला/ राज्याला उद्देशून भाषण करतात. अशा भाषणांचे एक ठरावीक स्वरूप असते. त्यात सांप्रत स्थितीचे वर्णन असते. सरकारच्या प्रयत्नांची माहिती, जनतेला उद्देशून उपदेश, आवाहन असेही त्यात असते. अशा संबोधनात कधी थेटपणे तर कधी आडवळणाने राजकारणही येते. हळूहळू या भाषणांची एक पठडी बनून जाते. वक्तृत्वाची शैली बदलते; पण भाषणांचा बाज तोच राहतो.
या प्रस्थापित ‘देश के नाम संदेश’ छापाच्या सार्वजनिक संबोधनाच्या खूप पलीकडे जाऊन गेली साडेआठ वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी केलेल्या हितगुजवजा संवादाची १००वी आवृत्ती येत्या ३० एप्रिलला प्रसारित होते आहे. प्रसारमाध्यम या नात्याने रेडिओची सद्दी संपत असताना ‘मन की बात’ हा पंतप्रधानांचा जनसंवाद अनेक कारणांनी वैशिष्टय़पूर्ण ठरला आहे. तो लोकप्रियही आहे. त्यातील नित्यनव्या मुद्दय़ांमुळे त्याचे वृत्तमूल्यही टिकून आहे.
‘मन की बात’ हा एक सहज – संवाद या स्वरूपात विकसित झालेला कार्यक्रम आहे. यात कोणत्याही राजकीय विषयांची चर्चाच होत नसल्याने पक्षीय प्रचाराचा प्रश्नच येत नाही. शिवाय सरकारच्या योजनांची माहिती देऊन त्याचे तद्दन सरकारी बुलेटिन होऊ देणेही निक्षून टाळण्यात आले आहे. सुमारे शतकभरापूर्वी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझवेल्ट हे रेडिओवरून याच प्रकारचा संवाद साधत. हा उपक्रम ‘फायरसाइड चॅट’ या नावाने गाजला होता. ऑल इंडिया रेडिओच्या इतिहासात इतक्या नियमितपणे, दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी ११ वाजता असा कार्यक्रम खुद्द पंतप्रधानांच्या प्रेरणेने साकारण्याचे हे पहिलेच उदाहरण आहे. या संवादात पंतप्रधान अनेकदा खादीचे महत्त्व, भारतीय वाद्यांची निर्यात, पर्यटनवाढीसाठी परदेशस्थ भारतीयांच्या प्रयत्नांचे स्वरूप अशा विषयांकडे लक्ष वेधत, त्याचेही खूप वैशिष्टय़पूर्ण परिणाम दिसून आले.
आपल्या राष्ट्रीय नेत्याचा कळकळीचा आणि प्रामाणिक संदेश लोकांपर्यंत किती प्रभावीपणे पोहोचू शकतो, याचे उल्लेखनीय उदाहरण म्हणजे नरेंद्र मोदींनी खादीच्या वापराबाबत केलेले आवाहन. ३ ऑक्टोबर २०१४ ला ‘मन की बात’च्या पहिल्याच भागात पंतप्रधानांनी वर्षांतून एक तरी खादीचा कपडा विकत घेण्याचे आवाहन केले आणि नंतर अवघ्या आठवडय़ात खादीची विक्री १२५ टक्क्यांनी वाढली. पुढे ‘मन की बात’च्या ५८ व्या आणि ७९ व्या आवृत्तीतही पंतप्रधानांनी आपल्या परिसरात निर्माण झालेली उत्पादने, हातमाग आणि खादीचा वापर याबाबत आवाहने केली. परिणामी २०१४-१५ ते २०२१-२२ या कालखंडात खादी क्षेत्रातील एकूण उलाढालीत १०१ टक्के, तर नुसत्या खादीच्या विक्रीत ३३२ टक्के एवढी प्रचंड वाढ झाली.
पणन आणि ग्राहक वर्तणूक क्षेत्रातील संशोधनपर अहवालांसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘िमटेल कंपनी’ने ‘स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्याबाबत भारतीय ग्राहकांचा दृष्टिकोन’ या विषयावर २०२१ मध्ये सादर केलेल्या अहवालात स्पष्टपणे नमूद केले की कोविड महासाथीच्या काळात ४५ टक्के भारतीयांकडून स्थानिक उत्पादनांना विशेष प्राधान्य दिले गेले. पंतप्रधानांनी भारतीय खेळणी वापरण्याचेही आवाहन केले होते. गेल्या काही वर्षांत जवळपास तीन हजार कोटींची खेळणी भारत आयात करीत असे. आता यात निम्म्याहून अधिक कपात झाली आहे आणि भारतीय खेळण्यांची निर्यात तिपटीने वाढली आहे.
‘भारत’ या संकल्पनेच्या केंद्रस्थानी भारतीय संस्कृती आहे. संस्कृतीचा आपल्या जगण्याशी असलेला संबंध अधोरेखित करीत पंतप्रधानांनी अनेक सांस्कृतिक विषय चर्चेला आणले. या विषयांच्या लांबलचक यादीत सिंगापुरातील ऐतिहासिक सिलत रोड गुरुद्वाराचे तिथल्या सरकारने केलेले नूतनीकरण, अमेरिकेतील ‘इस्कॉन’च्या कार्यकर्त्यां जादुरानी दास आणि त्यांची ‘भक्ती कला’ ही पारंपरिक चित्रशैली पुनरुज्जीवित करण्याचे प्रयत्न, भारतीय चित्रपट कलाकारांनी मिळविलेले ऑस्कर सन्मान इ. अनेक विषयांचा समावेश आहे. ज्या उत्सवांबद्दल अनभिज्ञता दिसते, अशा उत्सवांचा तपशीलवार उल्लेख ‘मन की बात’ मध्ये आला आहे. त्यात जैन समाजाचे संवत्सरी पर्व, ओदिशामधील नौरवाई उत्सव, ओणम, लोहडी, नवरेह इत्यादींचा समावेश होतो. शिवाय तमिळनाडूतील करकट्टम नृत्य, मणिपूरचे मैतेयी पुंग नावाचे वाद्य, आदिवासी महिलांनी झारखंडमधील हजारीबाग स्थानकाच्या भिंतींवर काढलेली सोहराई आणि कोहबार शैलीतील चित्रे, गुजरातमधील अजरक पिंट्र शैली जिवंत ठेवणारे चित्रकार इस्माईल खत्री यांची प्रतिभा, गोव्यातील अपंग खेळाडूंसाठीचा ‘पर्पल फेस्ट’ हा क्रीडा महोत्सव; अशा मुख्य उपेक्षित राहिलेल्या अनेक बाबींचे पंतप्रधानांनी जाणीवपूर्वक उल्लेख केले आहेत.
‘मन की बात’ हा कार्यक्रम ग्रामीण भारतात अनेक ठिकाणी सामूहिकरीत्या ऐकला जातो. पंतप्रधान अनेकदा शेती आणि ग्रामविकासाच्या क्षेत्रात ‘एकांडे शिलेदार’ होऊन परिवर्तनासाठी कार्यरत व्यक्तींचा, प्रयोगांचा व संस्थांचाही गौरवपूर्ण उल्लेख करतात. श्रीनगरच्या दल सरोवरातील कमळांच्या उत्पादनासाठी काम करणारी शेतकरी- उत्पादन संस्था (एफपीओ) व तिचे यश, जम्मू नजीकच्या डोडा जिल्ह्यातील भद्रवाह गावातील शेतकऱ्यांचे फुलांच्या शेतीचे प्रयोग, हिमाचलातील बढाना गावच्या एका सैनिकाने पगारातून ५७ हजार रुपये खर्च करून गावात शौचालये बांधण्यासाठी केलेली मदत, गुजरातमध्ये धानेरा जिल्ह्यात जमियत- उलेमा- ई- हिदया संघटनेच्या तरुणांनी दोन मशिदी व २२ मंदिरांच्या सफाईसाठी केलेले श्रमदान, राजस्थानात विद्यार्थिनींची गळती रोखण्यासाठी राबविलेली ‘अपना बच्चा – अपना विद्यालय’ ही मोहीम इ. अनेक उपक्रमांची नोंद पंतप्रधान घेतात.
व्यापक जनसहभाग हे या संवाद मालिकेचे आणखी एक वैशिष्टय़. एखाद्या वैशिष्टय़पूर्ण कामगिरी करणाऱ्या नागरिकाशी पंतप्रधान संवाद साधतात, तर कधी नागरिकांनी पत्राद्वारे वा ईमेलद्वारे विचारलेले प्रश्न किंवा केलेल्या सूचना यांचा तपशिलात उल्लेख करतात. राजस्थानातील अलवर येथील पवन आचार्यने पंतप्रधानांना, दिवाळीसाठी घरीदारी मातीच्या पणत्या लावण्याचे आवाहन त्यांनी प्रकटपणे करावे अशी विनंती केली आणि पंतप्रधानांनी सप्टेंबर २०१५ च्या आपल्या संवादात ही सूचना विस्ताराने मांडली. डेहराडूनच्या, १२ वीत शिकणाऱ्या गायत्रीने नदीपात्रात प्लास्टिकचा कचरा टाकण्याच्या सवयींबद्दल क्षोभ व्यक्त केला. मोदींनी त्याचे स्वागत करून त्याचा विस्तृत उल्लेख केला.
‘पीपल्स-पद्म’च्या माध्यमातून प्रतिष्ठेच्या पद्म पुरस्कार निवडीत पंतप्रधानांनी पारदर्शकता आणली व या प्रक्रियेचे लोकशाहीकरणही घडवले. जवळपास त्याच धर्तीवर आपापल्या क्षेत्रात शांतपणे कार्यरत असलेल्या प्रतिभाशाली आणि परिश्रमी अनाम समाजसेवकांना मोदींनी ‘मन की बात’च्या माध्यमातून प्रकाशात आणले आहे. २८ मे २०१७ च्या ‘मन की बात’मध्ये पंतप्रधानांनी स्वयंप्रेरणेने वर्सोवा किनारा स्वच्छ करण्याचे अभियान हाती घेणाऱ्या अफरोज शाह या तरुण वकिलाचा गौरवपूर्ण उल्लेख केला आणि अफरोज एका रात्रीत हिरो झाला. घरातील दिव्यांसाठी सौर ऊर्जेचा वापर करण्याचा प्रचार करणारी नूर जहाँ (कानपूर), शौचालय बांधायलाच हवे यासाठी उपोषणाला बसणारी दहावीतील मल्लामा गंगावती (कर्नाटक) अशा व्यक्ती ‘मन की बात’मुळे प्रसिद्ध झाल्या. त्यांना खूप प्रोत्साहनही मिळाले. महाराष्ट्रात जुन्नरजवळ राहणाऱ्या म्हेत्रे कुटुंबीयांनी घरातल्या लग्नात साडी- चोळी, नारळ असा परंपरागत आहेर करण्याऐवजी पेरूची रोपे पाहुण्यांना भेट दिली. त्याबद्दलही पंतप्रधानांनी त्यांना शाबासकी दिली.
बराक ओबामा, बिल गेट्स, शिंझो अंबे, आँग सान स्यू ची अशा अनेक परदेशी नेत्यांनाही ‘मन की बात’चे अप्रूप वाटले. शंभरीच्या उंबरठय़ावरील या संवादाबाबत काही संशोधन- प्रबंध आणि पुस्तके प्रसिद्ध झाली. आकडेवारी पाहता ‘मन की बात’ची जादू अजूनही टिकून आहे. आता लोक हा कार्यक्रम दूरदर्शनवरही पाहतात, डाऊनलोड करून नंतर सवडीनेही ऐकतात/ पाहतात. यासंदर्भात पंतप्रधानांपर्यंत पोहोचणाऱ्या प्रतिक्रिया, सूचना, अभिप्राय यांत वाढत होत आहे.
या संवादातून पंतप्रधान नानाविध भूमिकांमधून जनतेला सामोरे जाताना दिसतात. देशाचे शासनप्रमुख ही तर व्यापक भूमिका आहेच, पण काही जणांसाठी ते त्यांचा उद्वेग ऐकून घेणारे वडीलधारे होतात, काहींसाठी ‘सांगेन गोष्टी युक्तीच्या चार’ अशी भूमिका घेणारे सल्लागार होतात, काहींसाठी पाठ थोपटणारे ‘जिंदा दिल’ मोठे भाऊ म्हणून पुढे येतात. कुटुंबाचा वडीलधारा कर्ता ही या सर्वाना कवेत घेणारी त्यांची भूमिका अर्थातच ठसठशीतपणे पुढे येते. वरवर पाहता ही पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ असली तरी त्यात जनसहभागाला जो वाव देण्यात आला आहे, त्यामुळे ती ‘जन की बात’ झाली आहे. पंतप्रधानांचा व्यासंग, त्यांची समयसूचकता, त्यांची गुणग्राहकता, त्यांची इतरांना पटवून देण्याची क्षमता, त्यांची रसिकता अशा नानाविध पैलूंचे मनोज्ञ दर्शन हा संवाद ऐकणाऱ्याला होते. एकूणच शतक गाठणाऱ्या या अनोख्या प्रयोगाबद्दल आणखी चर्चा, विश्लेषण व संशोधनही व्हायला हवे. संवादशास्त्रातील हा आगळा प्रयोग तो करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांची भूमिका याची आणखी विस्तृत चर्चा – पूर्वग्रहविरहित भावनेतून होऊ शकली, तर ती भविष्यात अनेकांना मार्गदर्शक ठरेल.