आशिकचा कारनामा समोर आला प्रेमात नकार मिळाल्याने पुणेकर मजनू झाला खंडणी किंग!
पुणे : पुण्यातील अनेक पक्षातील राजकीय नेत्यांना खंडणीच्या धमक्या आल्या होत्या. पोलिसांनी याचा तपास केला असता, हे सगळं काम पुण्यातील एका व्यक्तीचं होतं.
या व्यक्तीबाबतची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. पुणे शहरातील प्रतिष्ठित आणि राजकीय लोकांना व्हॉट्सॲप कॉल येतो आणि खंडणी मागितली जाते. एका महिन्यात पुण्यातील चार राजकीय नेत्यांना असे कॉल आले आणि यावरच न थांबता पॉलिटिकल करिअर बरबाद करू, अशा धमक्या देखील मिळाल्या. काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांच्यासह मनसे नेते वसंत मोरे यांचा चिरंजीव रुपेश मोरे या सगळ्यांना गेल्या एका महिन्यात खंडणी चे फोन आले होते.
मागच्या एका महिन्यात महेश लांडगे यांना 30 लाख रुपयांची खंडणी, अविनाश बागवेंना 30 लाख रुपयांची खंडणी आणि वसंत मोरे यांचा सुपूत्र रुपेश मोरेला जीव मारण्याची धमकी मिळाली. पोलिसांनी या गोष्टीची दखल घेत या हाय प्रोफाईल केसेस संदर्भात एक ऑपरेशन राबवलं आणि या प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी पुण्यातूनच अटक केली आहे. यातील मुख्य आरोपीचे नाव इम्रान शेख आणि याचा साथीदार म्हणजेच शाहनवाज खान. यातील इम्रान या आधी मनसेचे नेते वसंत मोरे यांना धमकी दिल्याप्रकरणी जेलची हवा खाऊन आला आहे.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या दोघांनी हे नेमकं का केलं? इम्रान शेख हा घोरपडी पेठेत राहत असून तो व्हॉटसअपवर विवाह नोंदणीसाठीचा गृप चालवत होता. या ठिकाणी त्याच्याकडे एका मुलीचे प्रोफाईल लग्नाच्या नोंदणीसाठी आली, मात्र इम्रान स्वतःच या मुलीच्या प्रेमात पडला. मात्र मुलीने स्पष्ट नकार देत इम्रानचा अपमान केला.
मुलीने नकार दिला याचा राग मनात ठेऊन इम्रानने तिची बदनामी करायला सुरुवात केली, आणि तिचे फोटो आणि मोबाईल नंबर सोशल मीडिया वर अपलोड केले. पोलीस मुलीवर कारवाई करतील असा तर्क त्याने लावला, मात्र असं काहीच झालं नाही. यानंतर इम्रानने राजकीय लोकांना फोन करून खंडणी मागायला सुरुवात केली. विशेष म्हणजे फोन वर धमकी देताना इम्रान त्या मुलीच्या गाडीत पैसे ठेवा असे तोऱ्यात सांगायचा.
याचा उद्देश म्हणजे फक्त आणि फक्त त्या मुलीची बदनामी होईल एवढाच होता. पोलिसांनी ही या मुलीला अनेकदा चौकशीला बोलावल मात्र चौकशीत काहीच निष्पन्न होत नव्हतं, अखेर इम्रान पोलिसांच्या हाती लागला आणि या आशिकचा कारनामा समोर आला. इम्रानने अगदी या मुलीचं दुसऱ्यासोबत लग्न लाऊन देऊन घटस्फोट घडवून आणून पुन्हा आपण लग्न करू, असा ही प्लॅन केला, मात्र तो फसला. या मुलीने यापूर्वीच चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती, म्हणून चिडलेल्या इम्रानने अखेर तिला मानहानीला सामोर जाव लागावं, म्हणून खंडणीचे फोन करायचे आणि पैसे ठेवायला पत्ता मुलीच्या गाडीच्या नंबर सह द्यायचा, असा उद्योग सुरू केला होता.