“राहुल बाबा लोकशाही नव्हे, तुमचं कुटुंब धोक्यात”, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली.
“राहुल बाबा लोकशाहीची चिंता सोडा, तुमचं कुटुंबच धोक्यात आहे”, असा हल्लाबोल अमित शाह यांनी केला. कौशंबी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना शाह यांनी भाजपाच्या जागा ३०० च्या पलिकडे घेऊन जाण्याचा मानस व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जनतेने टाकलेल्या विश्वासामुळेच हे घडणार असल्याचाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. उत्तर प्रदेशातील कौशांबी येथील कडा धाम येथे कौशांबी महोत्सवाचे उद्घाटन करण्यासाठी गृहमंत्री उपस्थित होते.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक आणि केशव प्रसाद मौर्य यांनी गृहमंत्र्यांचे कौशांबी येथे आगमन झाल्यावर स्वागत केलं. यानंतर गृहमंत्री माता शीतलाची पूजा करण्यासाठी कडा धाम येथे पोहोचले. येथून निघाल्यानंतर त्यांनी तीन दिवसीय कौशांबी महोत्सवाचे उद्घाटन केलं. यावेळी आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्याबाबत उपस्थितांना आवाहन केलं.
केंद्रीय गृहमंत्री कौशांबी येथे पोहोचल्यावर सिरथू येथील सपा आमदार पल्लवी पटेल गोंधळ घालतील अशी शक्यता होती. याच पार्श्वभूमीवर पहाटे पोलीस आणि प्रशासनानं त्यांना त्यांच्या घरी नजरकैदेत ठेवलं होतं. या कार्यक्रमात सपा आमदार पल्लवी पटेल यांना आमंत्रित करण्यात आलं नसल्याचे सांगण्यात येत आहे. तर स्थानिक आमदार म्हणून कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा आपला हक्क असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. याप्रकरणी संताप व्यक्त करत त्यांनी कार्यक्रमाला जाण्याची घोषणा केली होती.
यावेळी गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर प्रदेशातील ६०० कोटींहून अधिक किमतीच्या ११७ प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. हे प्रकल्प कौशांबीच्या विकासाची नवी दिशा ठरवतील, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी काँग्रेस नेत्यांना खुलं आव्हान देत ‘तुम्ही मैदान निश्चित करा, भाजपचे कार्यकर्ते देशात कुठेही लढायला तयार आहेत’, असं म्हटलं. यावेळी त्यांनी गृहमंत्री राहुल गांधी यांना झालेली शिक्षा आणि त्यांना सभागृहातून काढून टाकण्यावरही भाष्य केलं. देशाच्या कायद्यावर त्यांचा विश्वास नाही, असं शाह सांगितले.