पाण्याबाहेर काढण्यापूर्वीच ती वृद्धा चटकन उठली आणि चालू लागली !
भीलवडी : भिलवडी (ता. पलूस) येथे कृष्णा नदीपात्रात पांढऱ्या साडीतील एक महिला पडलेली ग्रामस्थांना दिसली.
काहींनी याची माहिती पाेलिसांना दिली. एक पोलिस तत्काळ नदीकाठावर आला. एका युवकासाेबत नदीकाठावर गेला. हा नेमका काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी दाेघेही पाण्यात उतरतात. पाण्यात तरंगणाऱ्या महिलेजवळ जाऊन अंदाज घेऊ लागतात. पुढे हाेऊन तिचे हात पकडतात, अन् ती ताडकन उठून चालू लागते…
एखाद्या हॉरर सिनेमाला शोभावा असा प्रसंग.. प्रत्यक्षदर्शी क्षणभर भंबेरीच उडाली. भिलवडी-अंकलखोपदरम्यानच्या पुलावरून कुणीतरी तयार केलेला या घटनेचा १ मिनिट ५३ सेकंदांचा व्हिडीओ सायंकाळी समाजमाध्यमांवर जाेरदार व्हायरल झाला. प्रत्येकजण फाेनाफाेनी करून हा प्रकार नेमका काय आहे याबाबत विचारणा करू लागला. मात्र, व्हिडीओमधील प्रसंगाची कुणालाच उकल झाली नाही.
त्याचे झाले असे, शनिवार दि. १ एप्रिल रोजी रात्रीनंतर अंकलखोप-भिलवडीदरम्यान असलेल्या पुलाजवळ भिलवडीच्या बाजूला कृष्णा नदीत एक महिला तरंगताना काहींनी पाहिली. अंकलखोप गावच्या बाजूने कुण्या महिलेचा मृतदेह वाहत येऊन तो भिलवडी पुलाच्या खालून घाटाच्या बाजूला तरंगत असल्याची माहिती भिलवडी पोलिसांत काहींनी दिली. पोलिस कर्मचाऱ्यांनी तत्काळ नदीपात्राकडे धाव घेतली. गुडघाभर पाण्यात एक वृद्ध महिला तरंगताना त्यांना दिसली. नेमका काय प्रकार असावा असा अंदाज घेत दाेघे पुढे झाले. एखादा मृतदेहच असावा, अशा शक्यतेने त्यांनी त्या महिलेचे हात पकडून नदीकाठाकडे ओढत नेले.
मात्र, पाण्याबाहेर काढण्यापूर्वीच ती वृद्धा चटकन उठली आणि चालू लागली. भिलवडी पुलावरून कोणीतरी या प्रसंगाचा व्हिडीओ तयार केला. ताे चांगलाच व्हायरल झाला. कोणी संबंधित महिला आत्महत्या करायला गेली असावी, कोणी ती पाण्यात पाय घसरून पडली असावी असा अंदाज व्यक्त केला. तर काहींना हा चमत्कार वाटला. एवढा वेळ ती पाण्यामध्ये काेणतीही हालचाल न करता तरंगत कशी राहिली? असा प्रश्न नेटकरी उपस्थित करीत हाेते.
आजीबाई माहेरात.. नेटकरी टेन्शनमध्ये..
घटनेनंतर आजीबाई भिलवडीशेजारी असणाऱ्या एका गावात आपल्या माहेरी जाऊन निवांत राहिल्या आहेत. मात्र, नेटकरी टेन्शनमध्ये आहेत.