खेळत असताना शाळेची संरक्षण भिंत अंगावर पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू
जळगाव : (आशोक कुंभार ) खेळता खेळता शाळेची संरक्षण भिंत अंगावर पडल्याने एका तेरा वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावात घडली आहे.
मोहित अशोक नारखेडे असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. घटनास्थळी जाऊन पोलिसांनी चौकशी केली आहे. त्याचबरोबर दोषींवर कारवाई करावी अशी मागणी पालकांनी केली आहे. ज्यावेळी ही दुर्घटना घडली त्यावेळी संपुर्ण हादरला होता. विशेष म्हणजे संरक्षण भिंतीचं काम हे रोजगार हमी योजनेतून केलं जातं होतं अशी माहिती मिळाली आहे.
जळगाव तालुक्यातील नशिराबाद हे अशोक नारखेडे मोहितचं गाव आहे. त्याचे वडील अशोक नारखेडे एका सिमेंटच्या कंपनीत ट्रॅक्टर ड्रायव्हर आहेत, तर आई निर्मलाबाई मोलमजुरी करते. दोघेही शुक्रवारी नेहमीप्रमाणे कामाला गेले होते. शाळेला सुट्टी असल्याने मोहित मित्रांसोबत गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारात खेळत होता. खेळता खेळता त्याच्या अंगावर शाळेची संरक्षण भिंत कोसळली. त्यात मोहित गंभीर जखमी झाला. गावातल्या लोकांनी त्याला लगेच खासगी रुग्णालयात हलवलं. पण प्रकृती गंभीर असल्याने त्याला जळगावच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात केलं होतं. त्याठिकाणी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
ज्या ठिकाणी ही घटना घडली, त्या शाळेच्या संरक्षण भिंतीचं काम हे रोजगार हमी योजनेतून केलं जातं होतं. पण नशिराबाद ग्रामपंचायतीचं नगरपालिकेत रूपांतर झाल्यामुळं हे काम थांबलं. हे काम निकृष्ट दर्जाचं असल्यानेच मोहितचा मृत्यू झाल्याचा आरोप लालचंद पाटील जिल्हा परिषद सदस्य यांनी केला आहे. संबंधित घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार असून विद्यार्थ्यांमध्ंये घबराहाटीचे वातावरण आहे.