छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण..
देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. सध्या देशात XBB.1.16 व्हेरियंटचे रुग्ण अधिक आढळत असल्याने वाढत्या कोरोना रुग्ण संख्येचं कारण हा व्हेरियंटच असल्याचं मानलं जात आहे. देशात कोरोनाच्या XBB.1.16 व्हेरियंटचे आतापर्यंत 610 रुग्ण आढळले आहेत. या व्हेरियंटचा 11 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात शिरकाव झाला आहे.
नाशिक : राज्यात पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढू लागला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे. याचदरम्यान, आणखी एक महत्वाची बातमी समोर आली आहे.
आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री छगन भुजबळ यांना देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ हे येवला दौऱ्यावर आले होते. तेथील नियोजित कार्यक्रम आटोपून ते नाशिकला परतत असतानाच त्यांना थंडी, ताप आला होता. यामुळे त्यांना तातडीनं अपोलो रग्णालयात देखील उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केल्या होत्या. मात्र, तपासणी करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.
विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशननंतर छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) हे आजारी पडले होते.त्यांना सोमवारी ताप आल्यानंतर त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. यात भुजबळ यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं आहे.