पाणी देता का पाणी? शब्बीर मामूंच्या गायींची आज पाण्यासाठी भटकंती
निःस्पृह गो-सेवेसाठी ज्या शब्बीर मामूंना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार दिला. त्याच शब्बीर मामूंच्या गायी आज पाण्यासाठी भटकत आहेत. ‘गोसेवा हीच ईश्वरसेवा’ या विचारांवर चालणाऱ्या दोन्ही सरकारांचं मात्र मामूंच्या दुरवस्थेकडे लक्ष नाही.
बीड : बीड जिल्ह्यातल्या शिरूर कासार येथील शब्बीर मामू हे आजघडीला १७० ते १८० गायी सांभाळतात. ते लहानपणापासून गायी सांभाळण्याचे काम निरपेक्ष भावनेने करतात. विशेष म्हणजे ते गाईचे दूध काढत नाहीत किंवा विकतही नाहीत. त्याचबरोबर गायींची वासरे किंवा गाय विकत नाहीत.
लोक जखमी गाईंना शब्बीर मामूंच्या स्वाधीन करतात. हे त्यांचं कार्य बघून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं कौतुक केलं. केंद्र सरकारने त्यांना २०१९ मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार दिला.
या समस्येवर बोलतांना पद्मश्री शब्बीर मामू म्हणाले की, आतापासूनच बोअरला पाणी नाही. पाण्यासाठी पाच किलोमीटर पायपीट करावी लागते. गायींना एका तलावाचा आसरा आहे. चाऱ्याचीही पंचाईत असून डोंगरात जनावरे चारावी लागतात. सरकारकडून फक्त पुरस्कारच मिळाला, परंतु कसलीही मदत मिळाली नाही.
महत्त्वाचं म्हणजे सकाळी आणि दुपारी गायींना पाणी मिळतं. मात्र संध्याकाळी गायी तहानलेल्याच असतात. त्यांच्या पाण्याचा प्रश्न उग्र झाला आहे. गोसेवेमुळे पद्मश्री मिळालेल्या शब्बीर मामूंच्या गायींसाठी राज्य सरकार काही करेल का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.