Video:धावत्या दुचाकीला बांधून कुत्र्याला 2.5 किमीपर्यंत नेलं फरफटत; नंतर काय?
उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये कुत्र्याला दुचाकीला बांधून फरफटत नेल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
इस्लाम नावाच्या व्यक्तीने रस्त्यावरील कुत्र्याचे पाय दोरीने बांधले आणि त्यानंतर दुचाकीला बांधून सुमारे अडीच किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. स्थानिक लोकांनी पाठलाग करून दुचाकी थांबवली आणि इस्लाम या व्यक्तीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. तसेच कुत्र्याला उपचारासाठी रूग्णालयात नेण्यात आले. विजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चरणसिंग कॉलनीत ही घटना घडली. डीएव्ही स्कूलपासून सुमारे अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या फूड फॉरेस्ट ढाब्यापर्यंत कुत्र्याला फरफटत नेण्यात आल्याचे दिसुन येत आहे.
#Ghaziabad
गाजियाबाद में एक शख्स ने कुत्ते को बाइक से बांधकर घसीटी। pic.twitter.com/mzEH4l7ftx— Gautam Geetarjun (गीतार्जुन) (@GautamGeetarjun) March 19, 2023
दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचे म्हणणे आहे की, संबंधित कुत्रा पिसाळलेला होता आणि तो लोकांना चावत होता. म्हणूनच त्याला लोकांच्या वरदळीपासून दूर नेत होतो. यावर पीपल्स फॉर ॲनिमल्स (PFC) या संघटनेच्या गाझियाबादच्या अध्यक्षा सुरभी रावत म्हणाल्या, “विजयनगर पोलीस स्टेशन हद्दीतील चरणसिंग कॉलनीमध्ये हा इस्लाम राहतो. इस्लामने सर्वप्रथम रस्त्यावरील कुत्र्याच्या डोक्यावर वीट मारली. त्यामुळे तो जखमी होऊन बेशुद्ध झाला. यानंतर त्याने कुत्र्याचे पाय दोरीने बांधले. मग दोरीच्या साहाय्याने त्याला दुचाकीच्या मागे बांधून फरफटत नेले. तेवढ्यात वाटेत काही लोकांनी दुचाकी थांबवली आणि कुत्र्याची सुटका केली.”
स्थानिक पोलीस अधीक्षक (SP) अंशू जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियाच्या माध्यमातून हा व्हिडीओ प्राप्त झाला. यामध्ये एक व्यक्ती कुत्र्याला दुचाकीच्या मागे बांधून फरफटत नेत आहे. व्हिडीओची अधिक माहिती घेतल्यावर तो विजयनगर पोलीस स्टेशनचा असल्याचे निष्पन्न झाले. या व्यक्तीची ओळख पटवून त्याला अटक करण्यात आली आहे. याबाबत पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.