नोकरभरतीच्या परीक्षेस निघालेल्या उमेदवाराचा अपघातात मृत्यू
यवतमाळ : (आशोक कुंभार ) कृषी विभागातील नोकरभरतीची परीक्षा देण्यासाठी निघालेल्या उमेदवाराचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास नेर येथील फुटका माथ्याजवळ घडली.
सतीश बजरंगलाल जयस्वाल (४१, रा. शिवाजीनगर, नेर) असे मृताचे नाव आहे.
नेर तालुक्याच्या धामक येथील मूळ रहिवासी असलेला सतीश एका खासगी कृषी साहित्य कंपनीत काम करत होता. तो रविवारी सकाळी यवतमाळ येथे परीक्षा देण्यासाठी दुचाकीने (एमएच २८ एडी ४१९८) निघाला होता. येथे असलेल्या फुटका माथ्याजवळ त्याच्या दुचाकीला यवतमाळकडून येणाऱ्या अज्ञात ट्रकची धडक बसली. यात सतीश गंभीर जखमी होऊन गतप्राण झाला.
त्याच्या मागे आई, दोन भाऊ व मोठा आप्त परिवार आहे. या घटनेची माहिती होताच धामक गावातील नागरिकांनी येथील शासकीय रुग्णालयात धाव घेतली. या घटनेचा पुढील तपास नेर येथील ठाणेदार रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनात जमादार मनोहर पवार करीत आहेत.