कर्ज वसुलीसाठी शेतकर्यांची मालमत्ता जप्त; जिल्हा बँकेचा कारवाईचा धडाका
सांगली: (आशोक कुंभार )जिल्हा मध्यवर्ती बँकेने मार्च अखेरच्या पार्श्वभूमीवर थकबाकी वसुलीसाठी जोरदार मोहीम सुरू केली आहे. वसुली संदर्भात थकबाकीदार सभासदांना नोटिसा काढण्यात आल्या. तरीसुद्धा त्याला दाद न दिल्याने जत तालुक्यातील 17 शेतकर्यांची सुमारे दहा कोटी रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी त्यांची मालमत्ता जप्त केली आहे. त्याचा बँकेने ताबा घेतला असून त्या मालमत्ते संदर्भात कोणीही व्यवहार करू नये, असे आवाहन करणारी नोटीस वसुली अधिकारी बी. आर. दुधाळ यांनी काढली आहे. जत तालुक्यातील सिद्धनाथ, मुचंडी, उटगी, उमदी, बालगाव या गावातील शेतकर्यांचा यात समावेश आहे.
मार्चअखेर जवळ आल्याने जिल्हा बँकेने थकीत कर्जाच्या वसुलीसाठी कारवाईचा धडाका लावला आहे. शेती आणि बिगरशेती कर्जाच्या वसुलीसाठी ओटीएस योजना राबविली जात आहे. मात्र अद्यापही जिल्ह्यातील अनेक शेतकर्यांकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. जत तालुक्यातील सर्वाधिक शेतकर्यांचा यात समावेश आहे. थकबाकीदारांना वसुलीच्या नोटीस देवूनही टाळाटाळ केली जात असल्याने 1 हजार 897 शेतकर्यांवर 101 ची कारवाई करण्यात आली.
जिल्हा बँकेकडून शेतीसह बिगरशेती संस्थांना कर्जपुरवठा केला जातो. शेतीसह सहकारी संस्थांची कर्जे मोठ्या प्रमाणात थकीत आहेत. बड्या संस्थांच्या थकबाकीमुळे बँकेचा एनपीए वाढला आहे. वाढती थकबाकी कमी करण्यासाठी एकरकमी कर्ज परतफेड, सामूहिक कर्ज परतफेड योजना लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर बँकेची वसुलीची मोहीम जोरदार सुरू आहे. त्याद़ृष्टीने आराखडा तयार करण्यात आला आहे.
गेल्या महिन्यात जिल्ह्यातील 46 हजार 367 शेतकर्यांकडे 481 कोटी 43 लाख रुपयांची थकबाकी होती. त्यामध्ये जत तालुक्यात सर्वाधिक 12 हजार 454 शेतकर्यांचे 51 कोटी 45 लाख थकित होते. वसुलीसाठी अधिकारी , कर्मचारी थकबाकीदारांना भेटत आहेत. ओटीएस योजनेनंतर्गत कर्ज थकीत झालेल्या दिवसापासून व्याजदरात अनुक्रमे 6.50 टक्के व 8.50 टक्के सवलत देण्यात येत आहे. तरी सुद्धा प्रतिसाद न मिळाल्याने कर्ज थकविणार्या 1 हजार 897 शेतकर्यांवर 101 ची कारवाई करण्यात आली. तरीसुद्धा जत तालुक्यातील 17 शेतकर्यांनी प्रतिसाद न दिल्याने त्यांची मालमत्ता जप्त केली असल्याची नोटीस शुक्रवारी बँकेने काढली
आहे.