क्राईमताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

शेतकऱ्याकडून खातेफोडीसाठी तलाठ्याने घेतली १० हजाराची लाच


धाराशिव : ( आशोक कुंभार ) शेतजमिनीची खातेफोड करुन देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच एका शेतकऱ्याकडून घेताना सावरगाव सज्जाच्या तलाठ्यास गुरुवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात ताब्यात घेतले आहे याप्रकरणी तामलवाडी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविंद्र दत्तात्रय अंदाने (५५) असे आरोपी तलाठ्याचे नाव आहे. ते सावरगाव सज्जात कार्यरत असून, केमवाडी सज्जाचाही अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे सोपविण्यात आला होता. यादरम्यान, एका ५१ वर्षीय शेतकर्याने त्याच्या नावे असलेल्या शेतजमिनीच्या खातेफोडीसाठी अंदाने यांच्याकडे अर्ज केला होता. संमतीपत्रानुसार पत्नी व मुलाच्या नावे फेरफारला नोंद घेण्याची विनंती या शेतकऱ्याने तलाठ्याकडे केली होती. मात्र, हे काम करुन देण्यासाठी १५ हजार रुपये लाच द्यावी लागेल, असे तलाठी अंदाने यांनी शेतकर्यास सांगितले. तडजोडीअंती १० हजार रुपये स्विकारण्यास संमती दिली. याचवेळी संबंधित शेतकर्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची उपाधीक्षक प्रशांत संपते यांनी शहानिशा केली असता तथ्य आढळून आल्याने नियोजनानुसार गुरुवारी दुपारी तलाठ्यास लाचेची रक्कम देण्याचे निश्चित करण्यात आले. प्रशांत संपते यांनी कर्मचारी दिनकर उलमुगले, विष्णु बेळे, झाकेर काझी, शेख यांच्यासह सावरगाव सज्जात सापळा रचला. येथे तलाठी अंदाने यांनी लाचेचे १० हजार रुपये स्विकारताच या पथकाने त्यांना रंगेहात ताब्यात घेतले. याप्रकरणी तामलवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button