मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडेंचं ‘ते’ ट्विट चर्चेत

बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.
संतोष देशमुख यांच्या हत्येचे धक्कादायक फोटो व्हायरल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकूडन दबाव वाढला होता. त्यानंतर आज सकाळपासून नाट्यमय घडामोडींनंतर धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला असून, त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे.
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. अन्न व नागरी पुरवठा या खात्याचा भार धनंजय मुंडे यांच्याकडे सोपवण्यात आला होता. मात्र, आता त्यांना पदातून मुक्त करण्यात आले असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी संतोष देशमुख यांची हत्या केली
यावर आमदार रोहित पवार म्हणाले की, गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी संतोष देशमुख यांची हत्या केली. त्यानंतर त्यांच्या शरीरावर लघुशंका केली. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण दोन महिन्यांपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे हे फोटो आले असावेत. तरीही धाडसी निर्णय घ्यावा असं तुम्हाला वाटत नसेल तर तुम्हाला मन आहे का? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा खास माणूस
वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा खास माणूस आहे हे जगाला माहीत आहे. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडची पाठराखण करु नका हे मला सांगायचं आहे. पंकजा मुंडेंनाही माझी विनंती आहे की मीडियासमोर या, तुमची भूमिका मांडा. आज जर थोरले मुंडे म्हणजेच गोपीनाथ मुंडे असते तर धनंजय मुंडेंना चाबकाने फोडून काढलं असतं आणि राजीनामा द्यायला लावला असता, असेही त्यांनी म्हटले आहे.