जय भवानी-जय शिवाजी!, 91 स्वराज्यरथांची नयनरम्य मिरवणूक,उद्घाटन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते
पुणे : (आशोक कुंभार )आकर्षक सजावट असलेले स्वराज्यरथ… एकापाठोपाठ येणारे सरदारांचे, मावळ्यांचे, वीर मातांचे स्फूर्ती देणारे स्वराज्यरथ…रणरागिणींच्या मर्दानी खेळांची चित्तथरारक मानवंदना…ढोलताशा पथकाचा गजर…सनई-चौघडयांचे मंगलमय सूर… हजारोंच्या संख्येने उपस्थित शिवभक्तांनी केलेला ‘जय भवानी-जय शिवाजी अशा जयघोष’ या पवित्र वातावरणात पुन:श्च शिवकाल शहरात अनुभवास मिळाला.
निमित्त होते, शिवजयंती महोत्सव समितीतर्फे लाल महालापासून आयोजित “शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा’ या भव्यदिव्य मिरवणुकीचे. मिरवणुकीचे उद्घाटन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते लालमहालातील जिजाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार घालून करण्यात आले.
यावेळी समितीचे अध्यक्ष अमित गायकवाड, सचिन पायगुडे, रवींद्र कंक, शंकर कडू, नीलेश जेधे, गोपी पवार, संजूभाऊ पासलकर, समीर जाधवराव, प्रवीण गायकवाड, किरण शितोळे, मोहन पासलकर , मयुरेश दळवी यांच्यासह स्वराज्यघराण्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. अटकेपार झेंडा फडकवणारे मानाजी पायगुडे यांच्या पुतळ्याचे तसेच सरनौबत येसाजी कंक यांच्या तैलचित्राचे अनावरण या सोहळ्यामध्ये झाले. मिरवणुकीचे यंदाचे 11 वे वर्षे आहे. या मिरवणुकीत तब्बल 91 स्वराज्यरथ सहभागी झाले होते.
मिरवणुकीत मानाचा मुख्य रथ जिजाऊ मॉंसाहेब, शहाजी महाराज शिवज्योत रथाच्या नेतृत्वाखाली सरसेनापती वीर बाजी पासलकर, सरदार कान्होजी नाईक जेधे, सरदार कृष्णाजी नाईक बांदल, सरनौबत सेनापती येसाजी कंक, सरदार नरवीर तानाजी मालुसरे, मानाजी पायगुडे, कान्होजी कोंडे, बाबाजी ढमढेरे, पिलाजीराव सणस, हैबतराव शिळीमकर, सरलष्कर सरसेनापती हंबीरराव मोहिते, संताजी घोरपडे, सरदार गोदाजी जगताप, सरनोबत सिधोजी थोपटे, तोरणा किल्लेदार गोदाजी भुरूक,
सरनोबत नागोजीराव कोकाटे, श्रीमंत माने सरकार घराणे, सरदार हिरोजी इंदलकर, श्रीमंत सरदार राऊतराव ढमाले, श्रीमंत सुभेदार खंडोजी माणकर, श्रीमंत सरदार दयाजीराव मारणे गंभीरराव, सप्तसहस्त्री सरदार नावजी बलकवडे, वीर माता धाराऊ गाडे, सरखेल कान्होजी आंग्रे, सरदार शिवाजी इंगळे, हिंमतबहाद्दर विठोजी चव्हाण, श्रीमंत राजे जाधव व राजे जाधवराव, श्रीमंत सरदार लुखजीराव घारे, सरदार संभाजी काटे, जगद्गुरु संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज भक्ती शक्ती स्वराज्यरथ, श्रीमंत हरजीराजे महाडीक, सरनोबत पिलाजी गोळे, सरदार प्रतापराव गुजर, सरदार वाघोजी तुपे, श्रीमंत पिलाजीराव राजेशिर्के,
श्रीमंत महाराज छत्रसाल बुंदेला धारदेवास, महाराष्ट्राचे श्रीमंत पवार घराणे, समशेर बहाद्दर श्रीमंत दमाजीराव गायकवाड सरकार, श्रीमंत महादजी शिंदे सरकार, गुप्तहेर प्रमुख बर्हिजी नाईक, शिवरत्न शिवा काशीद जीवा महाले, सरदार जीवाजी सुभानजी रणनवरे, सरदार मल्हारजी तुकोजी निगडे, शुरवीर एकोजी शिरोळे, शुरवीर शेलार मामा, राजेश्री सरदार हांडे, श्रीमंत भोईटे, सरदार मांढरे, वीर बाजीप्रभु देशपांडे यांचे स्वराज्यरथ आपआपला गौरवशाली इतिहास मांडत सहभागी झाले.