बीड लग्न जुळत नसल्यामुळे युवकाची आत्महत्या..
लग्न जुळत नसल्याने एका युवकाने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जिल्ह्यातील नेकनूर येथील मूळ असलेला केशव काशीद याचा मृतदेह पाली धरणाजवळील तळ्यात आढळून आला. अग्निशमन विभागाने त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. घटनेने मृत केशवच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
बीड: पाली या धरणावर तीन दिवसांपूर्वी एक अज्ञात व्यक्तीचे कपडे सापडले होते. या कपड्यात त्या व्यक्तीचे आधार कार्ड, पैशाचे पॉकेट आणि 75 रुपये आढळून आले होते. यानंतर या व्यक्तीचा शोध सुरू झाला. या त्या व्यक्तीचे नाव केशव काशीद असल्याचे पुढे आल्यानंतर या व्यक्तीच्या नातेवाईकांशी संपर्क साधून सापडलेल्या साहित्याची ओळख पटविण्यात आली. पोलिसांना अखेर पालीच्या तळ्यातच केशवचा मृतदेह आढळून आला आहे.
आधारकार्डवरून लागला शोध: मूळ रहिवासी नेकनुरचा असलेला केशव काशीद हा बीडमध्ये आपल्या मामाकडे राहत होता. त्यामध्ये तो गॅरेजवर देखील काम करत होता. मात्र तीन दिवसांपूर्वी मामा आपल्या फॅमिलीसोबत बाहेरगावी गेला असता केशव हा देखील त्या दिवसापासून बेपत्ता होता. मात्र पालीच्या धरणाकाठी केशवचे कपडे पाकीट आणि आधार कार्ड सापडल्याने पोलिसांनी तपास करून त्याची ओळख पटविली. त्यानंतर पोलिसांनी केशवचा शोध घेणे चालू केले त्या दिवशी तळ्यामध्ये रात्रीच्या वेळेस अग्निशामक दल बोलवून पोलिसांनी शोध घेतला. मात्र अंधारामुळे केशवचा शोध लागला नाही. पोलिसांनी सतत या शोध मोहिमेचा पाठपुरावा करत अखेर तीन दिवसानंतर तळ्याच्या पाण्यात केशवचा मृतदेह आढळला. केशवच्या कुटुंबावर यामुळे दुःखाचा डोंगर कोसळला.
लग्न जुळत नसल्याने होता चिंतेत: मृत केशवच्या कुटुंबाने पोलिसांना सांगितले की, लग्न जुळत नसल्यामुळे केशव अनेक दिवसांपासून चिंतेत होता. त्याचे वय देखील निघून चालले होते. अखेर केशवने घरात कोणी नसल्याचे पाहून टोकाचे पाऊल उचलले. केशव कष्टकरी होता. त्याने इतक्या टोकाचे पाऊल उचलणे योग्य नव्हते, असेही नातेवाईक म्हणत आहेत. मात्र तीन दिवस पोलिसांनी शर्तीचे प्रयत्न करत केशवला शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणात यंत्रणेचा वापर केशवचा शोध घेतला. अग्निशमन दलाच्या टीमने त्याचा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढून शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला. मात्र केशवच्या या टोकाच्या निर्णयाने काशीद कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बीड जिल्ह्यात लग्न जुळत नसल्याने आत्महत्या करण्याच्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.