नसबंदी कॅम्प मध्ये एकच धावपळ डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं आणि एकामोगामाग महिला बेशुद्ध
उत्तर प्रदेश : बाराबंकी येथे नसबंदी कॅम्पमध्ये (sterilization cam) ऑपरेशनच्या आधी 10 महिलांना भूलीचं इंजेक्शन देण्यात आलं. यानंतर नसबंदी पथकाचे डॉक्टर काही कारणास्तव ऑपरेशन न करताच आपल्या टीमला घेऊन निघून गेले.
इंजेक्शन दिल्यानंतर महिला बेशुद्ध पडू लागल्या असता रुग्णालयात (Hospital) एकच धावपळ सुरु झाली होती.
हे प्रकरण रामनगर सार्वजनिक आरोग्य केंद्रातील आहे. येथे शुक्रवारी नसबंदी कॅम्प लावण्यात आला होता. यासाठी 19 महिलांनी आपलं नाव नोंदवलं होतं. यामधील 10 महिलांनी भूलीचं इंजेक्शन देण्यात आलं. मुख्यालयातून आलेल्या डॉक्टरांच्या विशेष पथकाने नसबंदी ऑपरेशनच्या आधी बेशुद्धीचं इंजेक्शन दिलं तेव्हा सर्वच महिला बेशुद्ध पडू लागल्या.
महिला बेशुद्ध झाल्यानंतर नातेवाईकांचा गोंधळ
ऑपरेशन करणारे डॉक्टर अजित यांना समस्या जाणवू लागल्यानंतर ते आपल्या टीमला घेऊन मुख्यालयात परत गेले. 10 महिला बराच वेळ झाला तरी बेशुद्ध होत्या. इतका वेळ होऊनही डॉक्टरांच पथक ऑपरेशनला न आल्याने नातेवाईकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यानंतर आरोग्य केंद्रावर उपस्थित प्रभारी डॉक्टर हेमंत कुमार यांनी सर्वांना महिलांना घरी घेऊन जाण्यास सांगितलं. पुढील कँप लागेल तेव्हा कळवलं जाईल, त्यावेळी या असं त्यांनी सांगितलं.
ऑपरेशन करायचं नव्हतं, तर इंजेक्शन का दिलं – नातेवाईक
नातेवाईक बेशुद्ध अवस्थेत महिलांना घऱी घेऊन गेले. नातेवाईकांचं म्हणणं आहे की, डॉक्टरांना ऑपरेशन करायचं नव्हतं तर मग 4-5 इंजेक्शन कशाला दिले? सगळे बेशुद्ध आहेत. डॉक्टर कुठे गेलेत माहिती नाही. बेशुद्ध अवस्थेत त्यांनी घरी कसं न्यायचं हा प्रश्न आहे.
अॅनेस्थेशियाचा प्रभाव काही वेळाने संपतो – डॉक्टर हेमंत
सार्वजनिक आरोग्य केंद्र रामनगरचे प्रभारी डॉक्टर हेमंत यांनी सांगितलं आहे की “आज आमच्याकडे नसबंदी कँप लागला होता. 10 महिलांच्या ऑपरेशनची तयारी करण्यात आली होती. अॅनेस्थेशिया दिल्यानंतर डॉक्टर अजीत यांना काही अडचण असल्याने ते टीमसोबत निघून गेले. अॅनेस्थेशियाचा प्रभाव काही वेळाने संपतो. यानंतर या महिला पुन्हा सामान्य होतील”.