रात्रीतून 15 फूट भुयार खोदलं पण तिजोरीच फोडता आली नाही, चोरानं मग काय केलं?
मेरठ : एकच मोठा डल्ला (Robbery) मारावं अन् भरपूर कमाई करावी, अशा विचारात असलेल्या चोरांनी (Thieves) मोठा प्लॅन बनवला.
एक ज्वेलरी शॉप (Jewelry shop) लुटायचं. तंत्रज्ञानाची प्रगती होतेय, तशी चोरांचीही सोय होतेय. मोठी टेकनिक वापरून चोरांनी ज्वेलरी शॉप पर्यंत एका रात्रीतून तब्बल १५ फूट भुयार खोदलं. आजूबाजूच्यांना पत्ताही लागला नाही. ज्वेलरी शॉपच्या तिजोरीपर्यंत पोहोचला पण काय ते नशीब… त्याला तिजोरीच फोडता आली नाही.
तिजोरी फोडण्याचे खूप प्रयत्न केले. तिथे असलेली कृष्णाची मूर्ती उलटी करून पाहिली, पण चोरांना काही यश आलं नाही. अखेर तिजोरीवरच त्यांनी संदेश लिहिला. सॉरी.. आम्ही दुकानात चोरी करू शकलो नाहीत.
चोरट्यांनी तिजोरीवर लिहिलेला हा संदेश सध्या खूपच चर्चेत आहे.
कुठे घडली घटना?
ही घटना आहे मेरठची. सोनाराचं दुकान लुटण्यासाठी चोरट्यांनी १५ फूट भुयार खोदलं. तिजोरीपर्यंत पोहोचलेही पण ती फोडताच आली नाही. दीपक ज्वेलर्स लुटण्यासाठी हे प्रयत्न झाले. दुकान मालक म्हणाले, चोरी करण्याचा हा चौथा प्रयत्न आहे. मात्र हे नेमके कोण आहेत, याचा सुगावाही पोलिसांना लागला नाही.
कृष्णाची मूर्ती का हलवली?
भुयार खोदून चोरट्यांनी दुकानात प्रवेश तर मिळवला. सुमारे ५ हजार रुपये रोख आणि ४५ हजारांची आर्टिफिशियल ज्वेलरी लुटली. पण मुख्य तिजोरी त्यांना फोडता आली नाही. देवानं आपलं हे कृत्य पाहू नये म्हणून चोरांनी कृष्णाच्या मूर्तीचं तोंड दुसऱ्या बाजूने वळवून ठेवलं
भिंतीवर काय लिहिलं?
मोठा डल्ला मारण्यात अपयशी ठरल्यानंतर चोरांनी भिंतीवर संदेश लिहून ठेवला. आम्ही दुकानात चोरी करण्यासाठी आलो होतो. पण अपयशी ठरलो. त्यामुळे सॉरी म्हणतोय. फक्त कमावणं हाच आमचा उद्देश होता. कोणतंही सामान घेणार नव्हतो.
व्यापाऱ्यांचा संताप
या चोरीची माहिती मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला. पोलिसांविरोधात घोषणाबाजी केली. या घटनेतील आरोपींना लवकरात लवकर अटक व्हावी, अशी मागणी व्यापारी संघटनेने केली आहे. याच परिसरातील अन्य एका दुकानातून १ कंप्यूटर, एलसीडी, डाटा केबल, इन्व्हर्टर बॅटरी चोरून नेली. चोरट्यांची एवढी हिंमत पाहून मेरठ पोलीसांच्या कामावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.