साकुर पठार भागातील खड्डेमय रस्त्यांबाबत लेखी आश्वासनानंतर शिवप्रतिष्ठाणचे राहुल ढेंबरे यांनी तिसऱ्या दिवशी उपोषण सोडले..
साकुर पठार भागातील खड्डेमय रस्त्यांबाबत लेखी आश्वासनानंतर शिवप्रतिष्ठाणचे राहुल ढेंबरे यांनी तिसऱ्या दिवशी उपोषण सोडले…
घारगाव : संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागातील रस्ते खड्डेमुक्त करावेत या मागणीसाठी शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राहुल ढेंबरे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी साकूरजवळील बिरेवाडी फाट्यावर सोमवारपासून आमरण उपोषण सुरु केले होते. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी अखेर तब्बल ३ तासांच्या चर्चेनंतर अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांच्या हस्ते राहूल ढेंबरे यांना लिंबू सरबत देऊन उपोषण सोडविण्यात आले.
यावेळी जि. प सा.बा. पंचायत समितीच्या उपविभागाचे उप अभियंता पी. व्हि जाधव यांनी जिल्हा परिषद अंतर्गत असणाऱ्या साकूर ते बिरेवाडी फाटा रस्त्याचे काम १५ एप्रिल २०२३ पर्यंत तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता सौरभ पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत असणाऱ्या मांडवे बुद्रुक ते वरवंडी रस्त्याचे काम ३० मे अखेरपर्यंत तसेच प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे उप अभियंता राहुल गायकवाड यांनी रणखांबफाटा रणखांब वाडी ते वरवंडी रस्त्याचे काम मार्च २०२३ पर्यंत सुरू करण्यात येईल असे लेखी आश्वासन राहूल ढेंबरे यांना दिले.
उपोषणाच्या प्रारंभीपासूनच सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देत उपोषणकर्ते राहूल ढेंबरे यांच्याशी चर्चा करत उपोषण मागे घेण्याची हात जोडून विनंती केली होती. मात्र जोपर्यंत वरीष्ठ अधिकारी उपोषणस्थळी येणार नाही तसेच लेखी देत नाही तोपर्यंत उपोषणावर ठाम असल्याचे राहूल ढेंबरे यांनी सांगितले होते. त्यामुळे अधिकाऱ्यांना या मागण्यांबाबत कुठलाही तोडगा निघाला नाही. त्यामुळे थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांनी मध्यस्थी करत सदर मागण्यांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर राहुल ढेंबरे यांच्या मागण्यांवर तोडगा काढत तसे लेखी देण्यात आले. परंतु दिलेल्या मुदतीत काम पुर्ण तसेच चालू झाले नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा राहूल ढेंबरे यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.
यावेळी साकूर ते बिरेवाडी रस्त्याच्या साईट पट्ट्या बुजवण्याचे काम चालू असून संबंधित ठेकेदार मुरूमाऐवजी माती टाकून साइट पट्ट्या बुजवण्याचे काम करत असल्याने उपोषणकर्ते राहुल बाजीराव ढेंबरे तसेच बिरेवाडी ग्रामस्थ आक्रमक होत जि.प सा.बा. पंचायत समितीच्या उपविभागाचे उप अभियंता पी. व्हि जाधव यांना धारेवर धरत जाब विचारला. यावेळी माती काढून घेऊन तिथे मुरूम टाकला जाईल असे ग्रामस्थांना सांगितले.
यावेळी पोलिस निरीक्षक संतोष खेडकर, पोलिस कॉन्स्टेबल किशोर लाड, मिरा शेटे, नवनाथ अरगडे, किरण मिंडे, सचिन खेमनर, बाळासाहेब सागर, दूध संघाचे माजी संचालक पांडुरंग सागर, जयराम ढेरंगे, कृष्णा खेमनर, सरपंच निलम ढेंबरे, उपसरपंच आण्णासाहेब कढणे, मांडवे गावचे माजी सरपंच भाऊसाहेब डोलनर, सुदाम सागर, संतोष ढेंबरे, वरवंडी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष भागवत बस्ते, बाजीराव ढेंबरे, धोंडीभाऊ ढेंबरे, नानासाहेब ढेंबरे, निलेश सागर, राजेंद्र ढेंबरे, भास्कर ढेंबरे, पंढरीनाथ औटी आदिंसह पठारभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.