पोलिसांची थेट देशाच्या पंतप्रधानांवरच मोठी कारवाई
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक नुकतेच इंस्टाग्रामवर (Instagram video) एक व्हिडिओ अपलोड केल्यामुळं चर्चेत आलेत, त्यामुळं त्यांना पोलिसांनी दंड ठोठावलाय.
पंतप्रधान ऋषी सुनक यांनी त्यांच्या नॉर्थ वेस्टच्या (North West) प्रवासादरम्यान इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला, यामध्ये सुनक यांनी चालत्या कारमधील सीट बेल्ट काढला आहे. त्यामुळं पोलिसांनी आपल्याच पंतप्रधानांना वाहतूक नियमांचं उल्लंघन ठरवत दंड ठोठावला आहे.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, वाहतूक पोलिसांनी (Traffic Police) या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असं सांगितलंय. शुक्रवारी रात्री उशिरा पुष्टी झाल्यानंतर पोलिसांनी पीएम ऋषी सुनक यांना दंड ठोठावला आहे. विशेष म्हणजे, ऋषी सुनक यांना पोलिसांनी हा दंड ठोठावण्याची ही दुसरी वेळ आहे. गेल्या वर्षीच्या सुरुवातीला ऋषी सुनक यांच्यावर तत्कालीन पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांच्यासह कोविड-19 लॉकडाऊन नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोपही करण्यात आला होता. बोरिस जॉन्सननंतर अशाप्रकारे कायदा मोडणारे ऋषी सुनक हे दुसरे पंतप्रधान ठरले आहेत.
दरम्यान, 2025 मध्ये ब्रिटनमध्ये सार्वत्रिक निवडणुका (UK Election) होणार आहेत, त्यापूर्वी पंतप्रधानांवर वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याच्या आरोपांमुळं त्यांच्या प्रतिमेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. 2025 मध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी कंझर्व्हेटिव्ह पक्ष आधीच विरोधी मजूर पक्षाच्या सर्वेक्षणात पिछाडीवर आहे. डाउनिंग स्ट्रीटच्या प्रवक्त्यानं मीडियाला माहिती दिली की, पंतप्रधान ऋषी सुनक यांनी आपली चूक मान्य केली आणि माफी मागितली आहे. नॉर्थ इंग्लिश काउंटीमधील पोलिसांनी सांगितलं की, लंडनमधील एका 42 वर्षीय व्यक्तीलाही दंडाची नोटीस पाठवण्यात आली आहे.