महिलेचे कान कापून कानातील सोन्याचे दागिने लंपास
वृद्ध महिलेच्या कानातले २५ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेऊन दरोडेखोर पसार झाला. या घटनेत विमलबाई यांना मोठी दुखापत झाली असून त्यांच्या कानातून रक्तस्राव झाल्याने त्या जखमी झाल्या आहेत
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील रेल गावातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 70 वर्षीय वृद्ध महिलेचे कान कापून कानातील सोन्याचे दागिने लंपास केल्याचे घटना घडली आहे.
याप्रकरणी धरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विमलबाई श्रीराम पाटील (वय 70, रा. रेल) या गुरुवारी रात्री आपल्या पत्र्याच्या शेडमध्ये एकट्याच झोपलेल्या होत्या. यावेळी अचानक अज्ञात चोरट्याने शेडमध्ये घुसून विमलबाईंवर हल्ला करून त्यांच्या कानात असलेले 8 ते 10 ग्रॅमचे कानातले कान कापून काढून नेले. तसेच चोरट्याने त्यांच्या डोक्याला आणि तोंडावरही दुखापत केली.
दरम्यान शेजारची बाई सकाळी 9 वाजेच्या सुमारास विमलबाईंना पाहायला गेली तेव्हा त्या रक्तबंबाळ अवस्थेत पडून असल्याचे दिसून आल्या. तसेच त्यांचा नातू निलेश पाटील घटनेची माहिती मिळताच याठिकाणी आला. विमलबाईंजवळ 50 हजाराची रोकड असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.
घटनेनंतर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, चोपडा विभागीय अधिकारी कृषीकेश रावले, अमळनेर विभागीय अधिकारी राकेश जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. विमलबाईंच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे