दिवसाढवळ्या चोरी करणाऱ्या तीन बहिणांना अटक
मुंबई : दिवसाढवळ्या चोरी करणाऱ्या तीन बहिणांना अटक करण्यात आली आहे. मुंबई क्राईम ब्रँच युनिट 12 च्या टीमने चोरी प्रकरणी तीन सख्ख्या बहिणींना अटक केली आहे.
या तिन्ही बहिणींवर मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. या तीन बहिणी अतिशय हुशारीने निर्जन वस्तीत घुसतात. चोरी करतात आणि दिवसाढवळ्या डल्ला मारून पळून जातात.
या तिघींना अटक केल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांच्याकडून 4 सोन्याच्या अंगठ्या, 4 मोबाईल फोन आणि 24 हजारांची रोकड जप्त केली आहे.
पकडलेल्या तीन बहिणींची नावे –
1. सुजाता शंकर सकट, वय 35 वर्षे
२. सारिका शंकर सकट, वय ३० वर्षे
3. मीना उमेश इंगळे, वय 28 वर्षे
29 नोव्हेंबर रोजी कस्तुरबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीच्या घरात घुसून लॉकरमधील सुमारे 4, 86,000 किमतीचे सोन्याचे दागिने चोरून या तिघी पसार झाल्या होत्या.
या प्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती, कस्तुरबा मार्ग पोलीस आणि मुंबई गुन्हे शाखा युनिट 12 ची टीम या चोरीच्या गुन्ह्याची उकल करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत होते आणि अखेर तिघेही गुन्हे शाखेच्या हाती लागले.
अटक करण्यात आलेल्या तिन्ही बहिणी कुर्ला परिसरातील रहिवासी आहेत. त्यांच्याविरुद्ध यापूर्वी मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे.
सध्या या तिन्ही बहिणी कस्तुरबा मार्ग पोलिसांच्या ताब्यात आहेत.पोलिसांनी तिन्ही बहिणींना अटक केली आहे. या तिघांनी आतापर्यंत किती चोरी केल्या आहेत. त्यांच्यासोबत या चोऱ्यांमध्ये आणखी कुणाचा हात आहे, याचा तपास सध्या सुरू आहे.