कोविड महामारी, रशिया-युक्रेन युद्धामुळे पसरलेली अस्थिरता यांमुळे जगभरात गोंधळ
ठाणे : हवामान बदल, कोविड महामारी, रशिया-युक्रेन युद्धामुळे पसरलेली अस्थिरता यांमुळे जगभरात गोंधळ माजला असून, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवड्यामुळे जगातील गरीबांचे जगणे बिकट झाले आहे.
जागतिक स्तरावरील पुरवठा साखळ्या विस्कळीत झाल्या आहेत. अशा स्थितीस तोंड देण्यासाठी लागणार्या आर्थिक पाठबळाच्या अभावामुळे प्रचंड सामाजिक दरी निर्माण झाली आहे. जी-20 परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या समस्यांचा सामना करण्यासाठी जागतिक स्तरावर सहकार्याचे नवे पर्व निर्माण होईल व सहमतीतून समस्या सोडविण्याचा मार्ग भारत देशाला दाखवेल, असा विश्वास केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्या भारती पवार यांनी सोमवारी ठाण्यात एका पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, प्रदेश सचिव संदिप लेले, माजी गटनेते मनोहर डुंबरे, सरचिटणीस विलास साठे, उपाध्यक्ष सागर भदे आदींची उपस्थिती होती. इंडोनेशियातील बाली येथे पार पडलेल्या 17 व्या ‘जी-20’ परिषदेत पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वावर जागतिक शिक्कामोर्तब झाल्यामुळे भारताची प्रतिष्ठा उंचावली असून जगातील प्रभावशाली राष्ट्रांचे नेतृत्व करण्याची संधी आता भारताला मिळाली आहे. जग एकाच वेळी भू-राजकीय तणाव, आर्थिक मंदी, ऊर्जेच्या वाढत्या किंमती, आणि साथीच्या रोगांचे दीर्घकालीन दुष्परिणाम अशा विविध संकटांशी झुंजत असताना जी-20 परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे आले आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वामुळे भारताकडे आलेले हे पद सर्वसमावेशक, महत्वाकांक्षी, निर्णायक आणि कृतिशील असेल, असा विश्वास राज्यमंत्री भारती पवार यांनी या पत्रकार परिषदेत व्यक्त केला. पुढील एका वर्षात नवनवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आणि सामूहिक कृतीला गती देण्यासाठी भारताच्या नेतृत्वाखाली जी-20 परिषद प्रमुख जागतिक प्रवर्तक म्हणून महत्वाची भूमिका बजावणार आहे. नैसर्गिक स्त्रोतांवर सर्वांची समान मालकी आणि ‘एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य’ या सूत्रानुसार, लोकशाहीची मातृभूमी असलेल्या भारताच्या ‘वसुधैव कुटुम्बकम’ या सांस्कृतिक मूल्याची ओळख जगाला होईल, असेही त्या म्हणाल्या.
विकासाचे लाभ जगातील प्रत्येकापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाली येथील 17 व्या परिषदेत सोडला असून शांतता आणि सुरक्षिततेखेरीज या सूत्राचा लाभ जगाला मिळणार नाही. यासाठी ‘युद्धाला नकार आणि शांततेचा पुरस्कार’ ही पंतप्रधानांची भूमिका या परिषदेच्या सदस्य राष्ट्रांनी स्वीकारली असून त्यासाठी जागतिक पातळीवर जनमत उभे करण्याचे आव्हानही भारत सहज पार पाडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
भारताची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्यामुळे, ऊर्जा सुरक्षा, अन्नसुरक्षा, आणि जीवितसुरक्षा या त्रिसूत्रीच्या आधारे भारताच्या प्राचीन परंपरेनुसार विश्वबंधुत्वाचे नवे पर्व पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली जगात सुरू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 1 डिसेंबर 2022 पासून अधिकृतपणे जी-20 परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे भारताकडे आली आहेत. जगासमोरील आव्हानांचा मुकाबला एकत्रितपणे करण्यासंबंधीची भारताची वचनबद्ध भूमिका आणि यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या सरकारने स्वीकारलेले पं. दीनदयाळ उपाध्याय यांचे एकात्म मानवतावादाचे सूत्र यांची सांगड घालून जगातील सर्वांना समान विकास आणि सामायिक भविष्याचा संदेश जगाला देण्याची संधी अध्यक्षपदामुळे भारताला मिळाली आहे. जगाच्या एकत्रित विकासासाठी मानसिकतेत मूलभूत बदल करण्याचे आव्हान पंतप्रधानांनी संधी म्हणून स्वीकारले आहे आणि त्यातूनच जागतिक नेतृत्व करण्याची भारताची क्षमता सिद्ध होणार आहे. निसर्गाचा विश्वस्त असल्याच्या जबाबदारीची जाणीव मानवजातीला करून देण्याच्या पंतप्रधान मोदी यांच्या प्रयत्नांस पाठबळ देण्यासाठी प्रत्येक भारतीयाने जी-20 च्या निमित्ताने राजकारण, पक्षभेद बाजूला ठेवून सहभागी व्हावे, असे आवाहनही भारती पवार यांनी केले.