लोकशाहीपातळीवरील वाद आणि चर्चा संपुष्टात आल्यानंतर भाजपचे सरकार समान नागरी संहिता आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज मांडले.
समान नागरी संहितेबाबत अगदी जनसंघाच्या काळापासून भाजपने आश्वासन दिलेले आहे. केवळ भाजपच नाही तर संविधान सभेने देखील संसद आणि राज्यांना योग्य वेळी हा कायदा आणण्याचा सल्ला दिला होता. कोणत्याही धर्मनिरपेक्ष देशासाठी धर्माच्या आधारावर कायदे तयार होता कामा नयेत. देश आणि राज्ये ही जर धर्मनिरपेक्ष असतील तर कायद्याला धर्माचा आधार कसा काय असू शकतो? कोणत्याही धर्मीयासाठी संसद आणि राज्य विधिमंडळाने संमत केलेला एकच कायदा असायला हवा असेही शहा यांनी येथे एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.
शहा म्हणाले, ”संविधान सभेने केलेली शिफारस काळाच्या ओघामध्ये मागे पडली. केवळ भाजप सोडला तर अन्य कोणताही राजकीय पक्ष समान नागरी कायद्याच्या बाजूने असल्याचे दिसत नाही. लोकशाहीमध्ये अनुकूल वाद-विवाद होणे गरजेचे असते. आताही या मुद्यावर खुल्या वातावरणामध्ये चर्चा होणे गरजेचे आहे.”
हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि गुजरात या तीनही भाजपशासित राज्यांमध्ये या अनुषंगाने सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. विविध धर्मांचे लोक त्यांची मते मांडू लागली आहेत. ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आम्ही त्यातून पुढे आलेल्या शिफारशींनुसार कारवाई करू.”
ते यश मंत्रिमंडळाचे
जम्मू- काश्मीरमधील ३७० वे कलम रद्द केल्याच्या मुद्याबाबत बोलताना गृहमंत्री शहा म्हणाले की, ” कोणत्याही यशामध्ये कुणा एका व्यक्तीचा समावेश असू शकत नाही. मोदी सरकारमधील मंत्रिमंडळाचा मी एक घटक आहे. त्यामुळे प्रत्येक यश हे केंद्र सरकारचे यश आहे असे मानावे लागेल. गेली अनेक वर्षे केवळ ३७० व्या कलमामुळे जम्मू- काश्मीर हा भारताचा भाग असल्याचा प्रचार केला जात होता. आता ३७० वे अथवा ३५ (अ) ही दोन्ही कलमे नसताना देखील जम्मू- काश्मीर हा भारताचा भाग आहे, असे शहा यांनी नमूद केले.
शहा म्हणाले
जम्मू- काश्मीरमध्ये लोकशाही रूजते आहे
पर्यटनस्थळांसाठी ५६ हजार कोटींची गुंतवणूक
८० लाख पर्यटकांनी आतापर्यंत राज्याला भेट दिली
दहशतवादी कारवाया, दगडफेकीच्या घटना घटल्या
दहशतवादाच्या उच्चाटनासाठी केंद्र सरकार कटिबद्ध
भारत पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने
तपास संस्थांच्या कारवायांना राजकीय चष्म्यातून पाहू नये
गुजरात निवडणुकीमध्ये भाजपचाच विजय होईल