पोलिसी खाक्या दाखवताच बॅग उघडली 1 कोटी 71 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
कल्याण : टिटवाळा स्टेशनवर रात्रीच्या सुमारास पु्ष्पक एक्स्प्रेस प्लॅटफॉर्मला लागली, एक व्यक्ती घाईघाईने बॅग घेऊन चालत्या गाडीतून खाली उतरला.
रेल्वे स्थानकातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नातच होता की, टिटवाळा रेल्वे स्थानकात (Titwala Railway Station) ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी त्याला अडवले. पोलिसांना त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या म्हणून त्याच्या बॅगेची झडती घेतली. बॅग उघडताच समोर जे दृश्य दिसले ते पाहून कल्याण रेल्वे पोलिसही चक्रावून गेले.
सदर व्यक्ती 1 ऑक्टोबर रोजी रात्री टिटवाळा स्थानकात उतरला. चालत्या गाडीतून घाईगडबडीत उतरल्याने आरपीएफला त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी केली. मात्र चौकशीत पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली.
पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने बॅग उघडून दाखवली. यावेळी बॅगेत तब्बल 1 कोटी 15 लाखांचे सोने आणि सुमारे 56 लाखांची रोकड आढळून आली. बॅगेतील घबाड पाहून रेल्वे पोलिसही चक्रावून गेले.
आयकर विभागाच्या टीमने 500 रुपयांच्या 11 हजार 200 नोटा असा एकूण 56 लाखांची रोख रक्कम आणि 1 कोटी 15 लाख 16 हजार किंमतीचे सोने असा एकूण 1 कोटी 71 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.