ताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेताच्या बांधावर ‘सॉईलोमीटर’द्वारे करा माती तपासणी


पुणे:स्वतःचा व्यवसाय, स्टार्टअप सुरू करण्यासाठी विविध पातळ्यांवर आव्हानांना सामोरे गेलेल्या उद्योजकांची अनेक प्रवासवर्णने आपण ऐकली आहेत. पण प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झालेल्या आणि नंतर कायमस्वरूपी असणारी सरकारी नोकरी सोडून देत एका तरुणाने स्वतःचे स्टार्टअप सुरू केले आहे.
मातीचा जिवंतपणा तपासण्यासाठी कोणत्याही प्रयोगशाळेत न जाता, आपल्या शेताच्या बांधावर केवळ तीन तासांत तपासणी करण्यासाठीचा ‘सॉईलोमीटर’ नावाचा संच या तरुणाने विकसित केला आहे.



दोन पिकांतील संपर्कप्रणाली ही मातीतील चांगली बुरशी असते. खत किंवा कीटकनाशके यांच्या अतिवापरामुळे मातीचा जिवंतपणा कमी होत आहे. म्हणजेच पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या सूक्ष्म जिवाणूंचे मातीमधील प्रमाण कमी होते. हे जिवाणू पिकांना खते उपलब्ध करून देतात व पिकवाढीसाठी त्यांची मदत होते. तसेच वातावरणातील बदलांपासून बचाव करण्यासाठीही हे जिवाणू पिकांना उपयुक्त ठरतात. त्यासाठी आवश्यक संप्रेरक ते तयार करून देतात.

पण कृत्रिम व महागडी संप्रेरके शेतकऱ्यांना विकली जातात. त्यातून शेतकऱ्यांचा खर्च वाढतो व मातीचेदेखील नुकसान होते. हे सर्व टाळण्यासाठी डॉ. प्रफुल्ल गाडगे यांनी हे उपकरण तयार केले आहे. डॉ. गाडगे हे पाटबंधारे विभागात वरिष्ठ लिपिक होते. त्यांनी जीवरसायनशास्त्र विषयात पीएच.डी. केली आहे. तसेच ते छत्रपती संभाजीनगरमधील एमजीएम कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणूनही कार्यरत होते. या दोन्ही नोकऱ्या सोडून त्यांनी शेतकऱ्यांसाठी काम करण्यास सुरुवात केली आहे.
शेतकरी जेव्हा बुरशीनाशक अँटिबायोटिक वापरतात तेव्हा मातीचा जिवंतपणा आणि मायक्रोफ्लोका मोठ्या प्रमाणावर लोप पावतो. मातीचे पुनर्भरण होण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत कमी झाले आहे आणि शेतकऱ्यांनाही त्याबाबतचे पुरेसे ज्ञान नाही. याबाबत शासनाने सॉईल हेल्थ कार्डचा उपक्रम हाती घेतला आहे, मात्र यात मातीची जैविक आरोग्य तपासणी समाविष्ट नाही.

ही चाचणी करण्यासाठी प्रयोगशाळेची गरज भासते आणि त्यासाठी तीन दिवसांचा कालावधी आणि दहा हजार रुपयांपर्यंतचा खर्च येतो. मातीतील अन्नद्रव्यांची तपासणी करून ती अन्नद्रव्ये पचविण्यासाठी, त्याच्या पिकासाठी योग्य बाबी उपलब्धता करून देण्यासाठी सूक्ष्म जिवाणूंकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यासाठी आम्ही मातीचा जिवंतपणा तपासण्याचे किट बनविले, असे डॉ. गाडगे यांनी सांगितले.

यासाठी होतो उपयोग

शेतकरी स्वतः आपल्या बांधावर माती तपासू शकतात

तपासणीसाठी केवळ तीन तासांची आवश्‍यकता

मातीत जिवाणू खतं व जैविक कीटकनाशकांचा दर्जा योग्य आहे का, हेसुद्धा तपासता येते

शेतकऱ्यांच्या खर्चात बचत करण्यास मदत करते

सेंद्रीय शेतीपद्धतीला मिळते चालना

मराठवाडा, विदर्भात मोठ्या संख्येने शेतकरी आत्महत्या सुरू होत्या. त्या वेळी आम्ही या विषयाचा अभ्यास सुरू केला. शेतकऱ्यांशी संवाद साधून सर्वेक्षण केल्यानंतर असे लक्षात आले की, कृषी रसायनांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात अज्ञान आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वाढतो, कारण एकाऐवजी रसायनांच्या तीन बाटल्यांचा वापर करण्याचा सल्लाही काहीजण देत असत. आपल्याला जे काम करायचे आहे ते चार भिंतींच्या चौकटीत राहून करता येणार नाही, त्यामुळे सरकारी नोकरी सोडल्यानंतर मी माझ्या केडगाव येथील घरावरच एक शेड उभारली आणि तिथे प्रयोगशाळेची स्थापना केली.

– डॉ. प्रफुल्ल गाडगे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button