जाचाला कंटाळून 12 वर्षीय मुलगी आणि नऊ वर्षीय मुलासह पाझर तलावात उडी घेत जीवन संपवले
नाशिक : सिन्नर तालुक्यातील मोह येथील विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून 12 वर्षीय मुलगी आणि नऊ वर्षीय मुलासह पाझर तलावात उडी घेत जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
राज्यासह जिल्ह्यात कौटुंबिक वादातून आत्महत्याचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यात विवाहितांचे प्रमाण जास्त आहे. अशातच नाशिकच्या सिन्नर तालुक्यात विवाहितेने दोन मुलांसह जीवनयात्रा संपवली आहे. ज्योती विलास होलगीर, गौरी विलास होलगीर, साई विलास होलगीर अशी निधन आलेल्या आई मुलांची नावे आहेत.
या प्रकरणी विवाहितेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरुन पतीसह सासरच्या चौघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पती, सासू-सासरा अशा तिघांना अटक करण्यात आली आहे. सिन्नर तालुक्यातील मोह येथील विवाहिता ज्योती विलास होलगीर ही मुलगी गौरी आणि मुलगा साई यांच्यासह शनिवारी घरातून निघून गेली होती. विवाहितेचा सासरा पांडुरंग कारभारी होलगीर याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याबाबत तक्रार नोंदविली होती.
शनिवारी सकाळी 9.15 वाजेच्या सुमारास मोह शिवारातील पाझर तलावात एका महिलेसह दोन चिमुकल्यांचे मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे ग्रामस्थांनी पाहिल्यानंतर पोलिस पाटील भाऊराव काशिनाथ बिन्नर यांना माहिती दिली. बिन्नर यांनी दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या सहाय्याने तिघांचे मृतदेह पाझर तलावातून बाहेर काढले.
विवाहितेचा भावाने दिली तक्रार
दरम्यान घटनेनंतर विवाहितेच्या भावाने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे सासरच्या लोकांकडून विवाहितेला सासरच्या मंडळींकडून मानसिक त्रास दिला जात असल्याचे म्हटले आहे. सासरच्या जाचाला कंटाळून ज्योतीने मुलांसह आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.