मुंबईतून संपूर्ण शिवसेना संपवण्याचा भाजपचा डाव आहे का?
उद्धव ठाकरेंना जमीन दाखवायची वेळ आली आहे असं म्हणत शाहांनी आपल्याला हिंदूंविरोधी राजकारण संपवायचं आहे असं सूतोवाच केलं आहे. मुळात शिवसेना ही हिंदुत्त्ववादी विचारांची असली तरीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत गेल्यामुळे त्यांच्या हिंदुत्वाची धार बोथट झाली असल्याचा आरोप शिवसेनेवर होत आहे. त्यानंतर आता मुंबईतून संपूर्ण शिवसेना संपवण्याचा भाजपचा डाव आहे का? असाही सवाल निर्माण झाला आहे.
आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यादरम्यान शाहांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.
त्यानंतर त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आगामी महापालिका निवडणुकीत भाजपचाच महापौर होणार असल्याचे विधान व्यक्त केले आहे. त्यांच्या या विधानामुळे अनेक चर्चांना उधाण आले असून, मुंबई महापालिकेच्या विजयातून एकनाथ शिंदेंचा आणि शिंदे गटाचा पत्ता कट करण्याचा भाजपचा डाव असल्याचे जाणकारांचे मत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेची एकहाती सत्ता असून, ही सत्ता भाजपकडे आणण्यासाठी भाजपचे अनेक वरिष्ठ नेत्यांनी कंबर कसली आहे. त्यात अमित शहांनी आगामी काळात मुंबईवर केवळ आणि केवळ भाजपचंच वर्चस्व राहिले पाहिजे असे आदेश पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे महापालिकेत शिंदे गटाला महापौरपद मिळणार नसल्याचे शाहांच्या आजच्या विधानावरून जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे भाजपसोबत युती करून सत्तेत आलेल्या शिंदे गटाचा महापालिकेतून पत्ता कट होणार असल्याच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत.
पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना शाहांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेनेने आमच्या पाठित खंजीर खुपसला असून, स्वत:च्या निर्णयामुळे शिवसेना छोटी झाल्याचे ते म्हणाले. केवळ दोन जागांसाठी शिवसेने युती तोडल्याचेही शहा यांनी यावेळी सांगितले. उद्धव ठाकरेंना जागा दाखवण्याची वेळ आली असून, बीएमसीसाठी भाजपचं 150 जागांचं टार्गेट असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.