पृथ्वीवर स्थापन केलेलं पहिलं गणेशाचं मंदिर ,ब्रह्मा, विष्णू, महेश, शक्ती आणि सूर्य यांनी गणेशाची स्थापना केली
महाराष्ट्राच्या संस्कृतीत दिवाळी, दसरा आणि गणेशोत्सव हे महत्त्वाचे सण. गणेशोत्सवात तर वेगळीच धूम असते.
दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा देशभरात गणेशोत्सव उत्साहात साजरा होत आहे, पण पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात असलेल्या मोरगावमध्ये कोणत्याही घरात गणपतीची प्रतिष्ठापना केली जात नाही. इतकं नाही, तर सार्वजनिक ठिकाणी गणपती बाप्पा विराजमान होत नाहीत. अष्टविनायकांपैकी पहिलं स्थान असतानाही मोरगावमध्ये गणेशोत्सव का साजरा केला जात नाही? तेच जाणून घेऊयात…
बारामती तालुक्यातील मोरगावचे मयुरेश्वर मंदिर हे श्री गणेशाचे जनमाणसात प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे. येथे गणेश चतुर्थीला गणरायाची विशेष पूजा केली जाते. प्राचीन आख्यायिकेनुसार या ठिकाणी गणपतीने एका मोरावर बसून सिंधुरासुर या राक्षसाशी युद्ध करून त्याचा वध केला होता. म्हणूनच या ठिकाणी असलेल्या गणरायाला मयुरेश्वर म्हणतात.
मोरगावमध्ये गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा का केली जात नाही?
एका पौराणिक कथेनुसार येथे ब्रह्मा, विष्णू, महेश, शक्ती आणि सूर्य यांनी गणेशाची स्थापना केली होती. हे पंचमहाभूतांनी पृथ्वीवर स्थापन केलेलं पहिलं गणेशाचं मंदिर आहे असल्याची आख्यायिका आहे आणि म्हणून मयुरेश्वराला सर्वांचा स्वामी म्हटलं जातं.
त्यामुळे मोरगावातील मयुरेश्वर येथून अष्टविनायक धाम यात्रा सुरू होते आणि यात्रेची सांगता मोरगावलाच होते. मोरगावच्या मंदिरातील मयूरेश्वराची मूर्ती स्वयंभू आहे. या मूर्तीची स्थापना पंचमहाभूतांनी मिळून केली होती. येथे ही मूर्ती स्वयंभू असल्याने या गावात कोणीही मातीची गणेशमूर्ती बसवत नाहीत.
मयुरेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश
मयुरेश्वर मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. चतुर्थीला पहाटेपासूनच मंदिर परिसरात भक्तांच्या रांगा पाहायला मिळतात. भाद्रपद व माघ महिन्यात मुक्तद्वार यात्रा असते. वर्षात १० दिवस चालणाऱ्या या मुक्तद्वार यात्रेत सर्व धर्मातील भाविक आणि महिलांना मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश दिला जातो आणि मयुरेश्वराला हातानं स्नान करण्याची संधी दिली जाते. त्यामुळे या काळात देखील भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते.
“मयुरेश्वर मंदिरात वर्षभरात तीन मोठे उत्सव होतात. यावेळी गणेशाची पूजा केली जाते. साडेतीनशे वर्षापूर्वीचे जुने चांदीचे, सोन्याचे दागिने मयुरेश्वराच्या अंगावर घातले जातात. माघ आणि भाद्रपद यात्रा काळातील तीन दिवस, दिवाळी पाडवा, दसरा या महत्त्वाच्या सणाला १ वर्षात ९ वेळा मयुरेश्वराला पोशाख आणि दागिने परिधान केले जातात”, असं पुजारी गजानन धारक हे सांगतात.