घरात मूर्तीची स्थापना करणं हे गैरइस्लामी असल्याचं म्हणत खान यांच्याविरोधात फतवा
उत्तर प्रदेशच्या अलिगढ येथे भाजपच्या मुस्लीम नेत्याच्या विरोधात फतवा जारी करण्यात आला आहे. त्यांनी घरात गणेशमूर्तीची स्थापना केल्यामुळे त्यांच्या विरोधात फतवा निघाला आहे.
रुबी खान असं या अलिगढ येथील भारतीय जनता पक्षाच्या नेत्याचं नाव आहे. खान या भाजपच्या महिला मोर्चा मंडळाच्या उपाध्यक्ष आहे. खान यांनी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने घरात गणेशमूर्तीची स्थापना केली. पण कट्टरतावाद्यांनी याला विरोध केला असून दारुल उलुम देवबंदचे प्रमुख मुफ्ती अरशद फारुकी यांनी खान यांच्याविरोधात फतवा जारी केला आहे.
घरात मूर्तीची स्थापना करणं हे गैरइस्लामी असल्याचं म्हणत खान यांच्याविरोधात हा फतवा जारी करण्यात आला आहे. हिंदूधर्मीय गणेशाला पूजनीय मानतात. त्यांना विद्या आणि सुख-समृद्धीची देवता म्हटलं जातं. पण, इस्लाममध्ये मूर्तिपूजा निषिद्ध आहे. इस्लाममध्ये अल्लाह खेरीज कुणाचीही पूजा केली जात नाही. जे लोक असं करतील ते इस्लामविरोधी असतील, असं फारुकी यांचं म्हणणं आहे.
दुसरीकडे खान यांनी या फतव्याचा कडाडून विरोध केला आहे. अशा प्रकारचे फतवे जारी करणाऱ्यांना या देशाची फाळणी झालेली हवी आहे. हा देश सगळ्यांचा आहे. इथे हिंदू आणि मुस्लिमांना एकत्र राहायचं आहे. अशा प्रकारच्या कोणत्याही फतव्याची मी पर्वा करत नाही. आणि खरे मुसलमान अशी विधानं करत नाहीत, असा हल्लाबोल खान यांनी केला आहे.
माझ्याविरोधात असे फतवे जारी होत असतात. असे विचार करणारे मुफ्ती आणि मौलवी हे कट्टरतावादी आणि जिहादी विचारांचे आहेत, ज्यांना फूट पडलेली हवी आहे. या देशात राहून ते या देशाच्या भल्याचा विचार करत नाहीत.