महिलेवर नौकरी आणि लग्न करण्याचे आमिष दाखवून बलात्कार तर महिलेविरुद्ध नगरसेविकेची खंडणीची तक्रार
राजकीय पुढाऱ्यांनेच महिलेवर बलात्कार केल्याची केज येथे घटना घडली आहे. तिला मदत करतो आणि नोकरी लावून लग्न करतो असे आमिष दाखवले आणि तिच्यावर बलात्कार केल्याच्या घटनेने खळबळ माजली आहे.
पीडित महिला तिच्या पतीपासून वेगळं राहत होती. तिच्या तक्रारीवरून ॲट्रॉसिटीसह बलात्काराचा गुन्हा केज पोलिसात दाखल करण्यात आला आहे.
याबाबत तक्रारीत नमूद केलेली अधिक माहिती अशी की, केजच्या जनविकास परिवर्तन आघाडीच्या नगरसेविका आशा कराड यांचे पती तथा पंचायत समितीच्या सदस्या मुक्ताबाई कराड यांचा मुलगा आणि राजकीय पुढारी असलेला सुग्रीव कराड याने एका असहाय्य व एका मुलीची आई असलेल्या परित्यक्ता महिलेवर नौकरी आणि लग्न करण्याचे आमिष दाखवून बलात्कार केला. तसेच तिचा गर्भपातही करायला भाग पाडले आहे, असे तिने नमूद तक्रारीत म्हटलं आहे.
पीडितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, नवऱ्याशी मतभेद झाल्याने ती तिच्या ४ वर्ष वयाच्या मुलीसह आई वडिलांच्या सोबत माहेरी राहत आहे. तिचे नवरा-बायकोतील भांडण मिटवण्यासाठी ती सुग्रीव कराड या राजकीय पुढाऱ्याकडे गेली होती. त्याने त्यांच्यातील भांडण मिटवण्यासाठी मध्यस्थी केली होती. तेंव्हापासून सुग्रीव याने तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. तसेच तिला नोकरी लावून देतो व त्यांचे भांडण मिटवून नांदायला पाठवतो, असे आमिष दाखविले.
एकेदिवशी सायंकाळच्या सुमारास पीडिता ही कोव्हिड केंद्रावर कामाला जाण्यासाठी गावातील बस स्टँडवर उभी होती. तिथे अचानक सुग्रीव कराड आला आणि तिला एका पांढऱ्या रंगाच्या चार चाकी गाडीत ओढुन घेवुन गेला आणि एका हॉटेलात तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. नंतर पीडितेला बस स्टँडवर आणून सोडलं. त्यानंतर दोन वर्षांपासून सुग्रीव याने तिच्या सोबत लग्न करतो म्हणून सतत लैंगिक अत्याचार केल्याचं पीडितेने पोलिसांना सांगितलं.
त्यातून ती पीडिता दोन महिन्यांची गरोदर राहिली होती. सुग्रीवने तिच्या सोबत लग्न करतो म्हणुन त्याने गर्भपाताच्या गोळ्या खायला दिल्या. परंतु त्याने तिच्या सोबत लग्न केले नाही. पीडितेने लग्न करण्यासाठी आग्रह केला असता ती तू वयाने लहान आहे, हलक्या जातीची आहे, असे म्हणून टाळाटाळ करू लागला. त्यांनतर त्याने तिला आत्महत्या करण्याला प्रवृत्त केलं. त्यातून तिने कंटाळून आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता, असं ती म्हणाली.
त्यानंतर देखील आपण लग्नाचा तगादा लावला. तर एकेदिवशी सुग्रीव त्याची नगरसेविका पत्नी, पंचायत समिती सदस्या आई आणि चार-पाच जणांनी घरी येऊन लाथा बुक्क्याने मारहाण करून पैसे आणि मोबाईल नेलं. या सगळ्यातून कंटाळून तिने केज पोलीस स्टेशन गाठले आणि आपली तक्रार दिली.
पीडितेने दिलेल्या फिर्यादी वरून राजकीय पुढारी सुग्रीव कराड, त्याची पत्नी जनविकास आघाडीच्या नगरसेविका सौ. आशा कराड, आई पंचायत समिती सदस्या मुक्ताबाई कराड, मीरा चाटे यांच्यासह पाच जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बलात्कार आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
पोलिसांनी अधिक चौकशी करून आरोपी विरुद्ध बलात्कार आणि अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा (ॲट्रॉसिटी) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
गु. र. नं. २६१/२०२२ भा. दं. वि. ३७६ (२) (एन) ३२७, १४३,३२३, ५०६ आणि १४९ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. यातील सर्व आरोपी फरार झाले असून पोलीस पथक आरोपींच्या मागावर आहेत.
पीडितेविरुद्ध नगरसेविकेची खंडणीची तक्रार
पीडित महिलेने तिचे कौटुंबिक भांडण मिटविण्याच्या बहाण्याने राजकीय सुग्रीव कराड याच्याशी जवळीक वाढवून २५ हजार रु. घेतले. तसेच आता पर्यंत तिने २५ लाख रु घेतले आहेत. तिने बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. तसेच बदनामी टाळण्यासाठी आणखी १२ लाख रु. खडणीची मागणी केली. म्हणून नगरसेविका आशा कराड यांनी त्या पीडितेविरूद्ध केज पोलीस ठाण्यात भा. दं. वि. २६२ गु. र. नं. ३८४, ३८५, ३८८, ३८८ ब्लॅकमेलिंग करणे आणि इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.