माझ्याकडे सगळा हिशोब आहे, बोलायला भाग पाडू नका-एकनाथ शिंदे
शिवसेना पक्षात बंडखोरी झाल्यापासून ठाकरे गट आणि शिंदे गटाचा वाद चव्हाट्यावर आला आहे. दोन्ही बाजुंच्या नेत्यांकडून एकमेकांवर जोरदार टीका केली जात आहे. ठाकरे गटातील नेत्यांकडून शिंदे गटातील नेत्यांचा उल्लेख सातत्याने ‘गद्दार’ असा केला जात आहे.
५० खोके (कोटी) घेऊन गद्दारी केल्याचा आरोपही त्यांच्यावर केला जात आहे. याच मुद्द्यावरून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना इशारा दिला आहे. माझ्याकडे सगळा हिशोब आहे, बोलायला भाग पाडू नका, असं त्यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता म्हटलं आहे.
शिंदे गटाच्या आमदारांवर गद्दारी केल्याच्या आरोपांबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा कोणी केली? हिंदुत्वाच्या विचारांशी बेईमानी कोणी केली? बाळासाहेबांचा आणि नरेंद्र मोदींचा फोटो लावून ज्या लोकांसोबत आपण निवडून आलो, त्यांच्या विचारांशी प्रतारणा कोणी केली? आपल्याला मत देणाऱ्या मतदारांशी बेईमानी कोणी केली? हे सर्व आम्ही बोलू शकतो. सध्या मी सज्जन भाषेत बोलत आहे. पण यावर मी नक्की बोलणार आहे.
“खोके कुठे जातात? आणि कोण-कोठे गद्दारी करतो? हेही मला माहीत आहे. माझ्याकडे सगळा हिशोब आहे. पण मला काम करायचं आहे. मला कामाने उत्तर द्यायचं आहे. त्यामुळे मी जास्त बोलत नाही. त्यांनीही मला बोलायला भाग पाडू नये, एवढीच माझी इच्छा आहे” असं विधान एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. ते मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते.
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, बाळासाहेबांनी आपल्या विचारांशी आणि शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या भूमिकेशी कधीही तडजोड केली नाही. प्रसंगी त्यांनी सत्तेला लाथ मारण्याचं काम केलं. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांना कधीही जवळ करता येणार नाही. त्यांना जवळ करण्याची जेव्हा वेळ येईल, तेव्हा मी माझं दुकान म्हणजेच शिवसेना पक्ष बंद करेन, अशी रोखठोक भूमिका बाळासाहेबांनी घेतली होती. बाळासाहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ राहून आपण शिवसेना मोठी केली. आहोरात्र सर्वजण झिजले, म्हणून देशात शिवसेना मोठी झाली.