ताज्या बातम्या

गोविंदांच्या ‘समन्वया’चे थर कोसळले; बहुसंख्य गोविंदांची वेगळी संघटना स्थापन करण्याची तयारी सुरू


मुंबई: मुंबई-ठाण्यातील समस्त गोविंदांना अंधारात ठेवून निवडक मंडळींनी कुटुंबातील सदस्यांसह केलेली स्पेनवारी, सदस्यत्वाचा अर्ज देण्यास करण्यात येत असलेली टाळाटाळ, बैठकीमध्ये केलेली बोळवण आदी विविध कारणांमुळे गोविंदा पथकांमध्ये दहीहंडी समन्वय समितीबद्दल असंतोष धगधगू लागला आहे.



दहीहंडी समन्वय समितीसोबत फारकत घेऊन मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातील बहुसंख्य गोविंदा पथकांनी वेगळी संघटना स्थापन करून वेगळी चूल मांडण्याची तयारी सुरू केली आहे. परिणामी, यंदा दहीहंडी उत्सवापूर्वीच गोविंदामधील ‘समन्वया’ची हंडी फुटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाप्रमाणेच मुंबई – ठाण्यात दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. तत्पूर्वी ठिकठिकाणची गोविंदा पथके दीड-दोन महिने रात्रीचा जागर करून मानवी मनोरे रचण्याचा सराव करतात. दहीहंडी फोडताना थर कोसळून होणाऱ्या अपघातात जखमी, वा मृत गोविंदांच्या कुटुंबांना मदत करता यावी, गोविंदांच्या समस्या सोडवता याव्या, राज्य सरकार, महानगरपालिका, आयोजकांबरोबर समन्वय साधता यावा या उद्देशाने दहीहंडी समन्वय समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीची २०१८ मध्ये धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणीही करण्यात आली. त्यानंतर समितीची कार्यकारिणीची नियुक्ती करण्यात आली

समितीच्या स्थापनेनंतर काही वर्षे गुण्यागोविंदाने कारभार सुरू होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून दहीहंडी समन्वय समिती सदस्य आणि गोविंदा पथकांमध्ये खटके उडू लागले होते. त्यातच गेल्या वर्षीची समन्वय समिती सदस्यांची स्पेनवारी वादाची ठिणगी ठरली. समन्वय समिती सदस्य आणि गोविंदा पथकांमध्ये शाब्दीक चकमकी उडू लागल्या. त्यामुळे तातडीने गोविंदा पथकांची एक बैठक रा.मि.म. संघाच्या सभागृहात बैठक बोलावण्यात आली. ही बैठकही वादळी ठरली. समन्वय समितीचे सदस्यत्व नसल्यामुळे काही गोविंदांवर बैठकीत मत मांडण्यास आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे उभयतांमधील वाद चिघळला आहे.

समन्वय समितीच्या कार्यकारिणीची मुदत फेब्रुवारी २०२३ मध्ये संपुष्टात आली आहे. त्यामुळे निवडणूक घेऊन नवी कार्यकारिणीची नेमणूक करणे गरजेचे आहे. मात्र सदस्य संख्येवर नव्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे आता मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यांतील लहान-मोठ्या गोविंदा पथकांनी अन्य संघटना स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. इतकेच नव्हे तर राजकीय मंडळींच्या भेटीगाठी घेऊन घडलेला प्रकार त्यांच्या कानावर घालण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, समन्वय समिती सदस्यांविरोधात समस्त लहान-मोठी गोविंदा पथके असा कलगितुरा रांगला आहे. या वादाला पूर्णविराम देण्यासाठी गोविंदा पथकांनी वेगळी संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, यासंदर्भात दहीहंडी समन्वय समिती अधयक्ष श्रीकृष्ण उर्फ बाळा पडेलकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

 

अनेक गोविंदा पथके दहीहंडी समन्वय समितीची सदस्य नाहीत. त्यामुळे समितीच्या बैठकीत मत मांडण्याची संधी नाकारली जाते. या पथकांनी सदस्य होण्याची इच्छा व्यक्त करून अर्जाची मागणी केली. परंतु समितीने अद्याप अर्जच दिलेला नाही. त्यामुळे गोविंदा पथकांनी वेगळी संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, असे वाकोला परिसरातील सूर्योदय क्रीडा मंडळाच्या गोविंदा पथकाचे दशरथ डांगरे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

गोविंदा पथकांच्या हिताच्या दृष्टीने काही गोष्टी होत नाहीत. त्यामुळे समस्त गोविंदा पथकांना एका छत्राखाली एकत्र आणण्यासाठी ही संघटना स्थापन करण्यात येत आहे. गोविंदांना मानसन्मान मिळावा, वर्षभर पथकांच्या माध्यमातून उपक्रम राबवता यावे हा नवी संघटना स्थापनेमागील उद्देश आहे, असे जोगेश्वरीमधील जय जवान गोविंदा पथकाचे विजय निकम यांनी स्पष्ट केले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button