पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आज सिनेस्टाईल थरार
इंदापूर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आज सिनेस्टाईल थरार पाहिला मिळाला. महामार्गावर इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक पाटी इथं चार चाकी गाडी अडवून गोळीबार करत कोट्यवधींची रोकड लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
हा प्रकार हवालाशी संबंधित असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे, पोलिसांकडून याबाबत गोपनीयता पाळण्यात येतेय. याप्रकरणी पोलिसांची पाच पथकं तैनात करण्यात आली आहेत.
गुजरामध्ये राहणारे भावेशकुमार पटेल पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करत होते. पहाटे अडीच वाजता वरकुटे पाटी गावाजवळ आले असता गतीरोधकामुळे त्यांनी गाडी हळू केली. हीच संधी साधत हातात शस्त्र घेतलेल्या चार लोकांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. पण भावेशकुमार यांनी गाडी न थांबवता पुढे नेली.
पण आरोपींनी भावेशकुमार यांच्या गाडीचा दुसऱ्या गाडीने पाठलाग केला. गाडी थांबवत असल्याने गुंडांनी भावेशकुमार यांच्या गाडीवर फायरिंग केली आणि भावेशकुमार यांची गाडी अडवली. गाडीत बसलेल्या भावेशकुमार आणि विजयभाई या दोघांना मारहाण करत गुंडांनी त्यांना खाली उतरवलं.
त्यानंतर गुंडांनी गाडीतील 3 कोटी 60 लाख रुपयांची रोख रक्कम, 14 हजारांचे दोन आणि 12 हजारांचा एक मोबाईल असे एकुण 3 कोटी 60 लाखांचा ऐवज चोरुन नेला.
याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून पोलीस याप्रकरणाचा कसून तपास करत आहेत.