पाच तासात एकाच गावातील चौघांचा मृत्यू संपूर्ण गावावर शोककळा
गावातील चौघांचा पाच तासात मृत्यू झाल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. बिहार राज्यातील पाटना जिल्ह्याला लागून असलेल्या भगवानपूर येथील मलाही गावात ही घटना घडली आहे.
या गावातील वॉर्ड क्रमांक 11 मध्ये बुधवार पाच तासांत चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. मृत्यू झालेले चौघेही ज्येष्ठ नागरिक होते.
चार मृतकांपैकी दोघे जण हे आजारी होते तर दोघांचा मृत्यू संशयास्पदरित्या झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. एकाच गावात चौघांची अंत्ययात्रा एकाचवेळी निघाली. चौघांचे अंत्यसंस्कार हाजीपूर येथील स्मशानभूमीत करण्यात आले. मलाही गावातील वॉर्ड 11 मधील निवासी साधू सिंह यांचा सर्वातआधी मृत्यू झाला. त्यांच्यावर पाटणा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी दुपारच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
65 वर्षीय साधू गेल्या एका आठवड्याभरापासून आजारी होते. साधू यांच्या निधनानंतर सायंकाळी 4 वाजता 80 वर्षीय बैजू यांचं निधन झालं. एकाच गावातील दोघांचा मृत्यू झाल्याने गावात स्मशान शांतता पसरली होती. दोघांच्याही अंत्यसंस्काराची तयारी ग्रामस्थांकडून सुरू करण्यात आली होती. त्याच दरम्यान आणखी एक बातमी आली आणि सर्वांनाच एक धक्का बसला.
रात्री 8 वाजण्याच्या सुमारास 75 वर्षीय फूल कुमारी यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. फूल कुमारी यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच त्यांचे 80 वर्षीय पती सुखी दास यांनाही मोठा धक्का बसला आणि त्यातच त्यांचं निधन झालं. पाच तासात एकाच गावातील चौघांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली. त्या दिवशी गावात कुणाच्याही घरी जेवण बनलं नाही.
गावाचे सरपंच उमेश राय यांनी सांगितले की, गावात घडलेल्या या चौघांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. मात्र, संकटाच्या काळात सर्व ग्रामस्थ एकत्र आले आणि एकमेकांना आधार दिला. ग्रामस्थांच्या या एकीची सर्वत्र चर्चा होत आहे.