मध्य प्रदेश, छत्तीसगढ व उत्तर प्रदेशमध्ये सतत 24 तास मुसळधार पाऊस
हिमाचल प्रदेशमध्ये पूर, भूस्खलन आणि ढगफुटीच्या 34 घटनांमध्ये 22 जणांचा मृत्यू झाला असून अजून 6 नागरिक बेपत्ता आहेत. कांगडा, मंडी आणि चंबा जिह्यात पावसाने सर्वाधिक हाहाकार माजवला आहे. पावसाचे थैमान सुरूच असल्यामुळे दुर्घटनांतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे
पावसाचा धुमाकूळ ,मध्य प्रदेश, छत्तीसगढ व उत्तर प्रदेशमध्ये सतत 24 तास मुसळधार पाऊस पडल्यामुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.
उत्तराखंडमध्येही पूरस्थिती निर्माण झाली असून या पुरात अनेक पर्यटक अडकले आहेत. तसेच ठिकठिकाणी झाडे व घरांच्या पडझडीच्या घटना घडल्या असून त्यात मनुष्यहानी झाली आहे. पुढील 24 तासांत पावसाचा जोर आणखीन वाढेल, असा अंदाज वर्तवत हवामान खात्याने अनेक भागांना ‘रेड अॅलर्ट’ जारी केला आहे.
वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तरेकडील आठ राज्यांत पावसाचा जोर वाढला आहे. सततच्या पावसामुळे डोंगरावरच्या मोठमोठय़ा दरडी लोकवस्तीत कोसळल्या आहेत. त्यातदेखील मनुष्यहानी व वित्तहानी होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. मध्य प्रदेशात मुसळधार पावसामुळे शनिवारी मध्यरात्री तवा व बरगी धरणाचे दरवाजे उघडावे लागले. राज्यात पुढील 24 तास पावसाचा ‘रेड अॅलर्ट’ जारी करण्यात आला आहे. झारखंडमध्ये पश्चिम सिंगभूम, सरायकेला-खरसावन आणि पूर्व सिंगभूम जिह्यांसह कोल्हानमधील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. नळकरी नदीत कार बुडून चौघांचा मृत्यू झाला. ओडिशामध्ये महानदीला आलेल्या पुरात 70 प्रवाशांना घेऊन जाणारी बोट वाहून गेली. अग्निशमन दलाने सर्व 70 जणांची सुटका केली. पंजाबमध्ये बियासच्या परिसरात 3 दिवसांचा ‘यलो अॅलर्ट’ जारी करण्यात आला आहे. जम्मू-कश्मीरातही अनेक नद्यांना पूर आला आहे.